सलग चार दिवसांपासूृन लागतोय रुग्ण वाढीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:29+5:302021-05-18T04:30:29+5:30
गोंदिया : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दीडशेच्या आत येत आहे. तर बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट ...
गोंदिया : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दीडशेच्या आत येत आहे. तर बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याने रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. तर मात करणाऱ्यांचा आलेख सातत्याने उंचावत असून कोरोना आता जिल्ह्यातून काढता पाय घेतल्याचे चित्र आहे. पण यामुळे गाफील न राहता जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेत कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची गरज आहे.
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे मागील आठ दिवसात जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवारी (दि. १७) जिल्ह्यातील ३६४ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचार दरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ११, गोरेगाव ७, आमगाव २५, सालेकसा ८, देवरी १४, सडक ९, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,४४,३२० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १,२०,२५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,४७,१६० जणांचे नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १,२६,५५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,४४१ काेरोना बाधित आढळले असून यापैकी ३५,९१४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,८७९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
.............
मृत्युदरात वाढ
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात येत असून बाधित रुग्णांची संख्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. पण कोरोना बाधित मृतकांचा आलेख सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे मृत्यू दरात वाढ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.६२ टक्के वर पोहचला आहे. मात्र रिकव्हरी रेट ९१.०७ टक्के वर पोहचल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
...........
लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाला गती मिळावी यासाठी विशेष शिबिर घेतले जात आहे. त्यामुळेच लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ४ हजार ६२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
.........
तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात एकूण शंभर खाटांचे विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे.