१९ महिन्यांची वेतन फरकाची रक्कम द्या; पंचायत समितीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 04:05 PM2024-12-10T16:05:43+5:302024-12-10T16:10:34+5:30
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ : पंचायत समितीवर गुरुवारी मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १९ महिन्यांच्या वेतन फरकाची रक्कम द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) गोरेगाव तालुका शाखेच्या वतीने गुरुवारी (दि.१२) पंचायत समितीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील ग्रामविकास विभागाने १९ महिन्यांच्या वेतन फरकाची रक्कम देण्याचे मान्य करून ही रक्कम शासनाने जिल्हा परिषदेला पाठविली. नियमानुसार पंचायत समितीमार्फत दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करणे आवश्यक होते; पण गोरेगाव पंचायत समिती वगळता सर्वांनी ही रक्कम अदा केली; परंतु वेतन फरकाची रक्कम न दिल्याने गोरेगाव पंचायत समितीवर आंदोलन करणार आहे.
तालुका महासंघाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास चौधरी व सचिव बुधराम बोपचे यांनी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा गोरेगाव पंचायत समितीतर्फे कर्मचाऱ्यांना ही रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या वेळी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले होते.
या संबंधाने २ डिसेंबर रोजी महासंघाच्या शिष्टमंडळाने बीडीओ यांना निवेदन दिले. त्यात ११ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम न मिळाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करणार आहेत. कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, जिल्हाध्यक्ष चत्रूगण लांजेवार, तुळशीदास चौधरी, बुधराम बोपचे यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे आवाहन मिथुन राऊळकर, दीपाली गौतम, सोमेश्वर राऊत, नीलेश मस्के, हिरोज राऊत, चंद्रशेखर कावळे, रामेश्वर वाघाळे यांनी केली आहे.