२७ कोटी रुपयांचे चुकारे आले पण पोर्टल अपडेटअभावी थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:48 PM2024-12-11T17:48:52+5:302024-12-11T17:50:14+5:30
८ लाख ३२ हजार क्विंटल धान खरेदी : २४८६८ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल् जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे करण्यासाठी फेडरेशनला २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. पण अद्यापही पोर्टल अपडेट झाले नसल्याने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला नाही. जोपर्यंत नवीन भीम पोर्टल अपडेट होत नाही तोपर्यंत चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त झाला तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १८३ धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत २४८६८ शेतकऱ्यांनी ८ लाख ३२ हजार ८२३ क्विंटल धानाची विक्री केली आहे. विक्री केलेल्या एकूण धानाची किंमत ही १९१ कोटी ५४ लाख रुपये आहे. धान खरेदी सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण धानाच्या चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने १९१ कोटी ५४ लाख रुपयांचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. अनेक शेतकऱ्यांनी धानाची विक्री करून चुकारे जमा झाले की उधार उसनवारी फेडण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला पहिल्या टप्प्यात २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. पण अद्यापही हे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते करण्यात आले नाहीत. चुकारे जमा करण्यासाठी शासनाकडून नवीन भीम पोर्टल तयार करण्यात आले आहे.
सध्या या पोर्टलचे अपडेट करण्याचे काम सुरू आहे. पोर्टल अपडेट करण्याचे काम पुन्हा आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे चुकारे बँक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा दहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.
१ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी
शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय धानाची विक्री व बोनसचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ११ हजार १३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर जवळपास ७५ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी होणे शिल्लक आहे.
नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी शासनाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपण्यास चारच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या चार दिवसांत नोंदणी करुन घ्यावी असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी कळविले आहे.