जिल्हा परिषदेच्या शाळांना लोकवर्गणीचा आधार
By admin | Published: September 13, 2014 11:59 PM2014-09-13T23:59:49+5:302014-09-13T23:59:49+5:30
जि.प. शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक तेथील पालकसभांकडे दुर्लक्ष करीत होते. विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेण्यासाठी पालक शाळेतच जात नव्हते. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या
नरेश रहिले - गोंदिया
जि.प. शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक तेथील पालकसभांकडे दुर्लक्ष करीत होते. विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेण्यासाठी पालक शाळेतच जात नव्हते. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘गावची शाळा आमची शाळा’ या उपक्रमाने पालकही जागृत झाले. परिणामी ते आपल्याा पाल्यांची प्रगती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आता शाळांच्या भेटी देत आहेत. या उपक्रमाला लोकसहभाग मिळत आहे. लोकवर्गणी करून शाळेच्या सुविधांमध्ये भर पाडण्याचे काम केले जात आहे.
गोंदिया तालुक्यातील जि.प.नवीन प्राथमिक शाळा इर्रीटोलाने गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात २०० पैकी १६६ गुण घेऊन यावर्षी वर्ग १ ते ४ यातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या शाळेला बक्षीसापोटी प्रभाग स्तरचे ४ हजार, तालुका स्तराचे ९ हजार व जिल्हा स्तराचे ३५ हजार असे एकूण ४८ हजार रूपये बक्षीसापोटी मिळविले आहेत. गावाची शाळा आमची शाळा या उपक्रमात सुरूवातीला १२५ गुण होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी २०० गुण ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर ७० गुण ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचन, लेखन किती येते, गणितीय प्राथमिक क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार विद्यार्थ्यांना किती येते याची पाहणी करून विद्यार्थ्यांचे सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन केले जाते. शाळेच्या प्रत्येक विकासात लोकसहभाग किती याची पाहणीही या उपक्रमातून करण्यात आली. या उपक्रमाने अधिकारी, लेप्रतिनिधी, नागरिक यांच्या शाळांना भेटी किती दिल्या जातात याची माहिती या निमित्ताने पुढे आली.
गावाची शाळा य उपक्रमामुळे लोकवर्गणीचा आधार जि.प. शाळांना मिळाला. मागच्या वर्षी जि.प.नविन प्राथमिक शाळा इर्रीटोलाने लोकवर्गणीतून दिड लाख रूपये गोळा केले होते. मुख्याध्यापक संदीप सोमवंशी यांनी सन २०१२-१३ या वर्षात शाळेसाठी स्वत:च्या जवळील ६० हजार रूपये तर सन २०१३-१४ या वर्षात ५० हजार रूपये खर्च केले आहे.गुणवत्ते बरोबर भौतिक सुविधेतही वाढ व्हावी यासाठी शाळेत सुंदर बाग तयार केली.
या बागेमुळे शाळेत विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचेही मन रमले. अधिकारी पदाधिकारी जागृत झाले. या उपक्रमात असलेल्या प्रभाग, तालुका व जिल्हा समितीने प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. आपल्या शाळेचे नाव लौकिक व्हावे यासाठी शिक्षकांनी आपला अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. परिणामी ४० विद्यार्थी संख्या असलेली शाळा विद्यार्थ्यांची गुणवत्ता राखत भौतिक सुविधेतही वाढ करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा झाली.
जि.प.नविन प्राथमिक शाळा इर्रीटोला ही शाळा २००२ पासून वस्तीशाळा होती. सन २००८ मध्ये जि.प. शाळेत रूपांतरीत झाली. त्याावेळी सोमवंशी यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली. सन २०१०-११ मध्ये इर्रीटोलाची नाटीका प्राथमिक विभागातून ‘शौचालय बांधा घरोघरी’ या विषयावर जिल्ह्यातून प्रथम आली.
त्यानंतर सन २०११-१२ मध्ये एटीएमचा राज्यस्तरीय प्रयोग सादर केला. या शाळेने विद्यार्थ्यासाठी अफलातून बचत बँक, प्रत्येक विद्यार्थ्याला एटीएम व पासबुक देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त ध्यानकुटी, विज्ञान प्रयोग शाळा, ग्रंथालय, माझी अभ्यासिका तयार करण्यात आली.
शाळेच्या विकासासाठी गावातील १८ तरूणांची युवा ग्रामविकास समिती तयार करण्यात आली. या शाळेला जिल्हा स्तरावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी मुख्याध्यापक संदीप सोमवंशी, शिक्षक प्रतिमा डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमल ठकरेले, सरपंच दुर्गा मेंढे व ग्राम पंचायतच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.