गोंदिया : यंदा मे महिना अर्धा संपत आला तरी रब्बीतील धान खरेदी जिल्हा प्रशासनाने अद्यापही सुरु केली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धान खरेदीस अधिक विलंब झाल्यास शेतकरी व प्रशासन या दोघांची चिंता वाढून बिकट परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे विना विलंब धान खरेदी सुरु करण्यात यावी. यासाठी आ. मनोहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन काही आवश्यक उपाय सुचविले.
राईस मिलर्स आणि शासन यांच्या धानाच्या भरडाई दर आणि अपग्रेडेशनवरुन निर्माण झालेला तिढा सोडवून रब्बीतील धान खरेदीचा मार्ग खा. प्रफुल्ल पटेल यांनी यशस्वीपणे सोडविला. काेरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात असताना सुध्दा शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७०० प्रति क्विंटल बोनस मिळवून दिला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. मात्र यानंतरही आता जिल्हा प्रशासन, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धानाची उचल करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे संकट, दुसरीकडे खरीप हंगामाची तयारी आणि रब्बीतील धानाची अद्यापही विक्री झाली नसल्याने या सर्वात शेतकऱ्यांची अधिक अडचण झाली आहे. त्यामुळे त्वरित धान खरेदीला सुरुवात करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने अधिक विलंब न करता धानाची उचल होईपर्यंत भाड्याने खासगी गोदाम घेऊन धान खरेदी करावी. तसेच लवकरात लवकर धानाची उचल कशी करता येईल या दृष्टीने युद्धपातळीवर नियोजन करावे, राईस मिलर्सनी सुद्धा शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता त्वरित धानाची उचल करुन भरडाईस सुरुवात करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी राईस मिलर्स व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यासह समन्वय साधून खरेदी कशी त्वरित सुरु होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आ. मनोहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु राहील असे देखील स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.