पाच दिवसात धानाची उचल करा, अन्यथा तीव्र आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:19+5:302021-05-27T04:31:19+5:30
गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप ...
गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप हंगामातील धानाची उचल झाली नाही तर ज्या संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश दिले आहे, त्यांचे गुदाम केवळ कागदावर आहे. एकंदरीत महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. येत्या पाच दिवसात धानाची उचल करून धान खरेदीला सुरुवात न केल्यास या विरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२६) येथे दिला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदी तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात यंदा रब्बीत ३२ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगितले जात असले तरी आतापर्यंत एकही क्विंटल धान खरेदी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रब्बी धान खरेदी करण्यासाठी सहकारी संस्थांना आदेश देण्यात आले आहे. त्यांनी गुदाम उपलब्ध असल्याचे केवळ कागदावरच दाखविले असून, प्रत्यक्षात गुदामच उपलब्ध नाही. खरीप हंगामात खरेदी केलेला ३० लाख क्विंटलहून अधिक धानाची अद्यापही उचल झाली नाही. अशातच खरीप हंगाम तोंडावर असून, अवकाळी पावसाचे संकटदेखील कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री न करता खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणाचे फलित असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांना येत्या पाच दिवसात संपूर्ण धानाची उचल करून रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. अन्यथा भाजपच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले,आमदार विजय रहांगडाले, आमदार परिणय फुके, माजी आमदार पालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आमदार रमेश कुथे, संजय पुराम, संजय टेंभरे, वीरेंद्र अंजनकर उपस्थित होते.
..........
त्या धान खरेदी केंद्राची सीबीआयकडून चौकशी करणार
मागील वर्षी खरीप हंगामातील धान खरेदीत काही सहकारी संस्थांनी मोठ्या प्रमाणात घोळ केला होता. त्या संस्थांचा धान खरेदीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांना पुन्हा धान खरेदीचा परवाना बहाल करीत भ्रष्टाचाराला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा असून, याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी यासाठी सीबीआयकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.