सुकडी-डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२च्या पाइपलाइनची कामे युद्धपातळीवर सुरू असून, चोरखमाराची कामे ९९ टक्के पूर्ण झाली आहे, तर बोदलकसा तलावात पाणी टाकण्यासाठी पाइपलाइनचे काम ९० टक्के पूर्ण होऊन फक्त १० टक्के काम उरले आहे. बोदलकसा, पिंडकेपार, सुकळी डाकरामपर्यंत कामे पूर्ण झाले आहेत, तर मेंढा रावणघाटा ही कामेसुद्धा पूर्ण झाली आहेत. फक्त सुकडी-डाकराम येथून अर्धा किमी अंतराचे काम उरले असून, पाइपलाइन गावातील रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी, अशा सूचना आमदार विजय रहांगडाले यांनी दिल्या आहे.
सर्वात अगोदर जेव्हा सर्वेक्षण झाले तेव्हा रस्त्याच्या बाजूने पाइपलाइन येणार असे नमूद होते. पण संबंधित विभागाने गावकरी व ग्रामपंचायतला विश्वासात न घेता पाइपलाइन शेतातून नेण्याचे ठरविले होते. यावर शेतकऱ्यांनी पाइपलाइन रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी, अशी मागणी आमदार रहांगडाले यांच्याकडे केली. त्यानुसार आमदार रहांगडाले यांनी पाइपलाइन रस्त्याच्या बाजूने नेण्याच्या सूचना देऊन संबंधी विभागाने प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर पाइपलाइनचे काम पूर्ण करून २०२१मध्ये बोदलकसा तलावामध्ये पाणी जायला पाहिजे, असे आदेश दिले.