घाटकुरोडा रेती घाटावरून तीन टिप्परसह पोकलॅन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:10 AM2018-12-11T00:10:35+5:302018-12-11T00:11:33+5:30
तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटकुरोडा रेतीघाटालगत साठवून ठेवलेल्या रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांनी मिळाली. या आधारावर तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर व दोन पोखलॅन तसेच १०५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटकुरोडा रेतीघाटालगत साठवून ठेवलेल्या रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांनी मिळाली. या आधारावर तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर व दोन पोखलॅन तसेच १०५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी मोहमद शहिद मोहमद जयबून शेख, रा. खैरबोडी, नंदकिशोर रमेश उके, रा. चिरचाळबांध, डालीराम तिडके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घाटकुरोडा रेतीघाट हा जिल्ह्यातील सर्वात मोठा रेतीघाट आहे. मागील काही दिवसांपासून या रेतीघाटावरुन अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू होते. मात्र महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या परिसरात रेतीमाफीयांचे मोठे प्रस्थ निर्माण झाले होते. रेती तस्करांनी कारवाई टाळण्यासाठी रेतीघाटालगत मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे उभारून ठेवले होते. तसेच संधी साधून या रेतीची रात्रीच्या वेळेस वाहतूक केली जात होती. मात्र आत्तापर्यंत रेती माफीयांवर कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास या रेतीघाटावरुन रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गवते यांना मिळाली. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनचा संपूर्ण ताफा घेवून घाटकुरोडा रेती घाटावर धाड टाकली. या दरम्यान पोकलॅन्डव्दारे तीन टिप्परमध्ये रेती भरुन वाहतूक केली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी रेतीची वाहतूक करणारे तीन टिप्पर व दोन पोकलॅन व १०५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ७ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तिन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे रेतीची अवैध वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.