‘युवां’साठी पोलिसांची धडपड
By admin | Published: March 4, 2016 01:46 AM2016-03-04T01:46:56+5:302016-03-04T01:46:56+5:30
राज्याच्या टोकावरील गडचिरोलीसोबत गोंदिया जिल्ह्यातील काही तालुके अनेक वर्षापासून नक्षल समस्येच्या आगीत सतत होरपळत आहेत.
युवक-युवतींना भरतीचे धडे : नक्षल भागातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
विजय मानकर सालेकसा
राज्याच्या टोकावरील गडचिरोलीसोबत गोंदिया जिल्ह्यातील काही तालुके अनेक वर्षापासून नक्षल समस्येच्या आगीत सतत होरपळत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना सतत दहशतीत वावरण्यासोबतच अनेक वेळा वित्तहानीही सहन करावी लागते. एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणावर सरकारी संपत्तीचा सुध्दा नाश होतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या दहशतीतून युवा वर्गाला बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांकडून अनोखा उपक्रम राबविला जात आहे. सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथील सशस्त्र दूरस्थ क्षेत्राच्यावतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम येणाऱ्या काळात या भागातील युवक-युवतींसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
बेरोजगारीमुळे नोकरीसाठी भटकणाऱ्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे भविष्य घडविण्यासाठी बिजेपार येथील दूरस्थ सशस्त्र क्षेत्राच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. आदिवासी नक्षल भागातील युवक-युवतींबरोबरच जिल्ह्यातील इतर भागात राहणाऱ्या युवकांनासुध्दा भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी तन-मन-धनाने समर्पित होऊन ते सहकार्य करीत आहेत.
एओपी प्रमुख पीएसआय हर्षल बाबर यांच्या नेतृत्वात व पुढाकाराने पीएसआय सचिन पांढरे आणि पीएसआय दत्ता पुजारी युवक युवतींना भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन करीत आहेत. एवढेच नाही तर शासनाच्या विविध विभागात असणाऱ्या नोकरीच्या संधीबाबत कोणकोणती तयारी करावी लागते याचे सतत मार्गदर्शन करीत आहेत.
या भरतीपूर्व मार्गदर्शनात मुख्यत्वे पोलीस सेवा भर्तीसाठी युवकांची शारीरिक क्षमता वाढविले, परीक्षेसाठी तयार करणे, शारीरिकदृष्ट्या योग्य होण्यासाठी विविध कसरती करवून घेणे याचा सराव नियमित केला जातो. परंतु ज्या युवक युवतींना इतर क्षेत्रात नोकरी करण्याची आवड असेल त्यांना त्यासाठीही योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे.
युवक युवतींना भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, योग्य प्रशिक्षण घेवून एखादा युवक गावातून शासकीय सेवेत गेला तर तो गावातील इतर युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरू शकतो व इतर मुलेही त्या दिशेने प्रयत्न करून मुख्य प्रवाहात येऊ शकतात. असा दूरदृष्टीकोन बाळगून येथे युवकांना विविध मार्गदर्शन दिले जाते.
पीएसआय दत्ता पुजारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की आदिवासी भागातील युवक अनेक बाबतीत सक्षम व बुध्दी चातुर्याने प्रबळ असतात. मात्र त्यांना आपल्या क्षमतेचा व बुध्दीचा सदुपयोग करण्याची संधी लाभत नाही म्हणून ते वाममार्गावर सुध्दा जाण्यास प्रवृत्त होऊन बसतात. भटकणाऱ्या युवकांना योग्य वेळी योग्य संधी मिळाल्यात येणाऱ्या काळात अनेक समस्यांवर मात करता येऊ शकते.
शासनाचे आदेश आणि माघार
अशा पद्धतीने युवा वर्गाला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे म्हणून शासनाने असे उपक्रम राबविण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी निधीसुध्दा आवंटीत करीत होते. परंतु आता शासनाचा निधी मिळणे बंद झाले. मात्र बिजेपार येथील एओपी प्रभारी व सर्व पीएसआय मिळून स्वत:च्या पगारातून पैसे खर्च करून भर्तीपूर्व प्रशिक्षण उत्साहपूर्वक वातावरणात चालवित आहेत. युवक-युवतींना कसल्याही बाबतीत कोणतीही अडचण येऊ दिली जात नाही. या त्यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे व देवरी येथील अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
शारीरिक व बौद्धिक मार्गदर्शन
या एओपीमध्ये नेहमी ६०-७० मुले-मुली प्रशिक्षण घेत असतात. घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात निसर्गरम्य वातावरणात चालत असलेल्या या भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मोहीमेत युवकांना उत्साहवर्धक प्रोत्साहन मिळत आहे. दररोज नियमित व्यायाम, पुस्तकांचे मार्गदर्शन, तसेच प्रत्येक आठ दिवसात बौध्दीक क्षमता चाचणी घेतली जाते. त्याचबरोबर कोणत्या परिस्थितीत कोणती सतर्कता बाळगली पाहिजे, कोणत्या कामात कोणती कर्तव्यदक्षता ठेवली पाहिजे या सर्व बाबी या ठिकाणी शिकविल्या जातात. यामुळे येणारे युवकवाम मार्गावर जाण्यापासून परावृत्त होतात. तसेच इतरांंना सुध्दा गैरमार्गाचा अवलंब करण्यात थांबविण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात.