संचारबंदीच्या काळात घटला रुग्णांचा पॉझिटिव्ही रेट ! १२ हजार बाधितांनी केली मात, संसर्ग येताेय आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:00 AM2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:21+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले.
कडक निर्बंध आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याने गर्दी कमी करण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोनाची साखळीसुद्धा खंडित करण्यास मदत झाली. राज्यातील १२ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली असून त्यात गोंदिया जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे.
१५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान जिल्ह्यात ११६०३ बाधितांची नोंद झाली तर त्यापेक्षा अधिक म्हणजे १२०४६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटसुद्धा वाढल्याचे चित्र आहे.
एकंदरीत संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा झाला.
तसेच जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
या तीन कारणांमुळे घटली रुग्णसंख्या
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना साखळी करण्यास मदत झाली. गर्दी कमी करण्यात यश आल्याने संसर्गाचे प्रमाण घटले.
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जनजागृती आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात आला. याची सुध्दा मदत झाली.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्याने रुग्णवाढीला ब्रेक लावण्यास मदत झाली आहे.
ग्रामीण भागात रुग्ण वाढले ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव रोखण्यास मदत झाली तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी व जनजागृतीवर भर देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत.