गोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया व नगरपालिका प्रशासन यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१६) सडक अर्जुनी नगर पंचायतची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊन महाविकास आघाडीचा विजय झाला. अध्यक्षपदी तेजराम मडावी तर उपाध्यक्षपदी वंदना डोंगरवार निवडून आले.
एकूण १७ सदस्यीय सडक अर्जुनी नगरपंचायतमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असता अध्यक्षाचे नाव आधीच निश्चित झाले होते. परंतु उपाध्यक्षपदाचे काय होईल याकडे शहरवासीयांच्या नजरा लागल्या होत्या. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे तेजराम मडावी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाची केवळ औपचारिकता बाकी होती.
सडक अर्जुनी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादीचे ७ सदस्य व एक समर्पित असे ८, शिवसेनेचे ४ तर, काँग्रेसचे २ असे एकूण १४ नगरसेवकांची महाविकास आघाडी तयार करण्यात आली होती. उपाध्यक्षपदासाठी देवचंद तरोणे, आनंद अग्रवाल, वंदना डोंगरवार आणि कमलादेवी अग्रवाल असे चार नामांकन दाखल करण्यात आले होते. देवचंद तरोणे, आनंद अग्रवाल हे राष्ट्रवादीचेच असल्याने त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर अपक्षाकडे फक्त ३ नगरसेवक असल्यामुळे कमलादेवी अग्रवाल यांनी ही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी तेजराम मडावी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच वंदना डोंगरवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नगरसेवक देवचंद तोरणे, तेजराम मडावी, वंदना डोंगरवार, आनंद अग्रवाल, दीक्षा भगत, कामिनी कोवे, शाहिस्ता शेख, गोपी खडेकर, अश्लेष अंबादे, वंजारी, शेख, अनिल गजभिये, अंकित भेंडारकर, कमलादेवी अग्रवाल, रेनू अग्रवाल, परिहार उपस्थित होते.