देवरी : शहरात वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्यातच शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त असताना तीन तास वीज पुरवठा खंडित असल्याने, भाविकांना बाप्पाच्या स्थापनेसाठी तीन तास वाट बघावी लागली. त्यामुळे एकीकडे बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता मनात असताना दुसरीकडे वीज पुरवठा नसल्याने गणेशभक्तांमध्ये निराशा निर्माण झाली.
किमान सणासुदीत तरी नागरिकांना अखंडित वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शहरात अचानक वीज खंडित होणे हे नित्याचेच झाले आहे. कधी दुरुस्तीच्या नावाखाली कधी बिघाड, तर कधी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज गुल्ल होत आहे. दिवसा तर बऱ्याचदा विजेचा लंपडाव बघायला मिळतो. त्यातच शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी ३ तास वीजपुरवठा खंडित होता. यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी ३३ केव्हीच्या मुख्य लाइनवर बिघाड असल्याचे सांगून नागरिकांचे सांत्वन केले. शहरात शुक्रवारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यापुढे नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी असे सणावारांचे दिवस आहेत. अशा वेळी तरी वीज जाऊ नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
----------------------
वसुली जोरात, मग खबरदारी घ्या
थकीत वीजबिलासाठी महावितरण कडून मोहीम जोरात चालविली जाते आहे. मग वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणनेही तेवढीच खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, येथे उलट कारभार सुरू आहे. अवघ्या जिल्ह्यातच दिवसभरातून कित्येकदा वीजपुरवठा खंडित होते, याचा नेमच नाही. किमान सणावारात तरी वीज कंपनीने यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.