प्राथमिक शाळा सकाळ पाळीत
By admin | Published: July 3, 2014 11:38 PM2014-07-03T23:38:02+5:302014-07-03T23:38:02+5:30
उष्णतेची लाट बघता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ७) सकाळ पाळीत करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी पाळीत
१५ तारखेपर्यंतचा निर्णय : विद्यार्थ्यांना उष्णतेपासून मिळणार दिलासा
गोंदिया : उष्णतेची लाट बघता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ७) सकाळ पाळीत करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी पाळीत सुरू झाल्या आहेत. येत्या १५ तारखेपर्यंत शाळा सकाळ पाळीत सुरू ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
पावसाने दडी मारली असून त्यामुळे तापमान काही कमी झाले नाही. जिल्ह्याचे तापमान अद्याप ४० डिग्रीच्या घरातच आहे. पाऊस बरसत नसल्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. तर उन्हाळा परतून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उन्हाची दाहकता बघता भल्याभल्यांना पाणी सुटत असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वातावरण अधिकच खराब आहे. यातून विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचेही प्रकार पुढे आले. याकडे बघत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शाळा सकाळ पाळीत करण्याची मागणी केली. तर या विषयाला घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले व शिक्षणाधिकारी पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
चर्चेत शिक्षक संघाच्या मागणीचे गांभीर्य व विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत प्राथमिक शाळा सकाळ पाळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ तारखेपर्यंत शाळा सकाळ पाळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळ पाळीत सुरू करण्यात आल्या.
तर १५ तारखे पर्यंत पाऊस पडल्यास शाळा आपल्या वेळेवरच भरणार. मात्र तोपर्यंत पाऊस न पडल्यास हा कालावधी वाढविण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एक हजार ४९ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)