सालेकसा : कोरोना काळानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्वत्र गणेशोत्सव सुरू असून, त्या दिशा निर्देशानुरूप तालुक्यात एकूण ४१ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ नियमाचे पालन करीत गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात सुरू आहे.
सालेकसा तालुक्यात एकूण ९२ गावे असून, यात ८५ प्रमुख गावे आहेत. कोरोना काळापूर्वी जवळपास प्रत्येक गावात सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा होत होता. प्रत्येक गावात लोक गणेश स्थापनेच्या दिवशी एकत्रित होऊन धार्मिक परंपरेनुसार समर्पित भावनेने गणेशोत्सव साजरा करतात; परंतु मागील दोन वर्षांपासून सार्वजनिक उत्सवावर कोरोनामुळे बंदी आली आहे. मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मात्र, यंदा राज्य शासनाने गणेशभक्तांच्या भावनेचा आदर करीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही नियम घालून दिले व निर्बंध लावले आहेत. यंदा तालुक्यात निम्म्यापेक्षाही कमी गावांत गणेश मंडळांचा गणपती उत्सव असून, जेमतेम ४१ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशाची स्थापना केली आहे.
.........
दीडशे कुटुंबाचे घरगुती गणपती
तालुक्यात एकीकडे सार्वजनिक गणपती उत्सव अर्ध्यावर आले असून, अनेक गावांमध्ये घरगुती गणपती उत्सव साजरे होत असून, लोकांनी आपापल्या घरी बाप्पाला विराजमान केले आहे. तालुक्यात एकूण १५० घरांत बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.
............
‘गणेशभक्तांनी कोविड नियमांचे पालन करीत सलोख्याच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा व राज्य शासनाच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
-अरविंद राऊत, ठाणेदार सालेकसा