शहरवासीयांची तहान भागविणार पुजारीटोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:04 AM2018-10-20T01:04:28+5:302018-10-20T01:05:42+5:30
मागील वर्षी सुध्दा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. तर यंदा आॅक्टोबर महिन्यात डांर्गोली येथील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना आठ दिवस अनियमित पाणी पुरवठा करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी सुध्दा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. तर यंदा आॅक्टोबर महिन्यात डांर्गोली येथील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना आठ दिवस अनियमित पाणी पुरवठा करण्यात आला होता. आॅक्टोबर महिन्यातच शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाल्याने यंदा पुन्हा पुजारीटोला धरणाच्या माध्यमातून शहरवासीयांची तहान भागविण्याची पाळी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे.
गोंदिया शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. शहरात प्राधिकरणाचे ४० हजारावर ग्राहक असून दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून गोंदिया पासून १७ कि.मी.अंतरावर असलेल्या डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. तिथून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने वैनगंगा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले होते. त्यामुळे गोंदियापासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून नहराव्दारे पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचवून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. मात्र यंदा चांगला पाऊस होवून देखील वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्याचा परिणाम आत्तापासूनच पाणी पुरवठ्यावर होत आहे. आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळीत घट झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मजीप्राच्या टीम ने केले निरीक्षण
शहरात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या एका टीमने डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्राची पाहणी केली. त्यावेळी पाणी पातळीत घट झाली असल्याचे टीमच्या लक्षात आले. त्यामुळे मागील वर्षी सारखीच यंदा सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
नहराव्दारे आणणार पाणी
डांर्गोली पाणी पुरवठा योजना ते पुजारीटोला धरणाचे अंतर हे जवळपास ९० कि.मी.चे आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून यंदा सुध्दा पुजारीटोला धरणाचे पाणी नहराव्दारे डांगोर्लीपर्यंत पोहचविले जाणार आहे. त्यासाठी मागील वर्षी सारखीच यंदा सुध्दा नहराची दुरूस्ती करण्याची गरज आहे.
आत्तापर्यंत प्रस्ताव नाही
पुजारीटोला धरणाचे पाणी राखीव ठेवण्यासाठी आत्तापर्यंत या विभागाकडून कुठलाही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरून नोव्हेबर-डिसेंबर महिन्यात विविध विभागांची बैठक घेतली जाते. याच बैठकीत पुजारीटोला धरणाचे पाणी आरक्षीत ठेवण्याबाबत सिंचन विभागाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. .
शहराला आत्तापासूनच अनियमित पाणी पुरवठा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरवासीयांना आत्तापासूनच अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच आत्ताच ही स्थिती असल्याने पुढील चार महिन्यात काय स्थिती राहणार अशी चिंता शहरवासीयांना सतावित आहे.