गोंदिया : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. तर धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोमवारी (दि.२०) सायंकाळी या धरणाचे १२ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. तर संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ होत होती. त्यामुळे सोमवारी सायंकाळी धरणाचे १२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या ३१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने आमगाव, सालेकसा, गोंदिया तालुक्यातील नदीकाठच्या गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांमध्ये ६५ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कालीसरार धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
.......
जिल्ह्यात गेल्या २४ तासात तालुकानिहाय झालेला पाऊस
गोंदिया- १९.२ मिमी
२ आमगाव : ३६.७ मिमी
३ तिरोडा : ८.८ मिमी
४ गोरेगाव : १७.० मिमी
५ सालेकसा : ५७.५ मिमी
६ देवरी : ३८.३ मिमी
७ अर्जुनी/मोरगाव : ५.२ मिमी
८ सडक/अर्जुनी : ९.३ मिमी
............................................
एकूण सरासरी : २२.२ मिमी .
..................
पिकांना संजीवनी
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. तर कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. धानाच्या वाढीसाठी आता उघाड पाहिजे आहे.
................
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा
संजय सरोवर : ९२.१३ टक्के
सिरपूर : ८१.८२ टक्के
पुजारीटोला : १०० टक्के
इटियाडोह : ७१ टक्के
कालीसरार : ९६.८७
............................