घरकुल वाटपावरून सरपंच व सचिवांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:24+5:30
२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले व उर्वरित चारशे कुटुंबांना वगळण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरकुलच्या प्रतीक्षा ड यादीमध्ये गावातील अनेक कुटुंबांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच यातील निम्मे नावे वगळण्यात आली. तेव्हा आमची नावे येथील सरपंच सचिवांनी वगळल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी वाद घातला.
दरम्यान, यावरूनच सरपंच आणि सचिवाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी (दि.२) तालुुक्यातील चुलोद येथे घडला. दरम्यान वेळीच पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने वाद मिटला.
२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले व उर्वरित चारशे कुटुंबांना वगळण्यात आले.
सरपंच, सचिव व संगणक परिचालक यांनी कटकारस्थान रचून नागरिकांची नावे वगळल्याचा आरोप येथील नागरिकांनी करीत उपस्थित ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. नागरिकांचा वाढता दबाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच यासंबंधाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा देण्यात आली. पोलिसांनी त्वरित दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा प्रत्यक्षात येथे उपस्थित होऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तूर्तास गावकरी शांत झाले.
यादीतील ४०० नावे नेमकी वगळली कुणी?
- येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले. त्यामुळे यादीतील ४०० लाभार्थ्यांची नावे नेमकी कुणी वगळली असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
घरकुलाचा सर्व्हे हा पंचायत समिती स्तरावरून करण्यात आला. त्यामुळे यात ग्रामपंचायत प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. तरी ज्या नागरिकांची नावे वगळण्यात आली त्यांच्यासाठी लवकरच विशेष ग्रामसभा घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- कार्तिक चव्हाण,
ग्रामविकास अधिकारी
प्रतीक्षारत ड यादीतील सर्वच कुटुंबांना शासनाने घरकुलाचा लाभ द्यावा. जेणेकरून गावात शांतता व सलोखा निर्माण राहील. ग्रामीण विकास यंत्रणेने पुनर्विचार करून आपली चूक तत्काळ दुरुस्त करावी.
- लतीश बिसेन,
सरपंच ग्रामपंचायत चुलोद