शेडेपार व मरामजोब जंगलातील जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:25 AM2021-04-19T04:25:59+5:302021-04-19T04:25:59+5:30
गोंदिया: देवरी तालुक्याच्या शेडेपार शेतशिवार व मरामजोब जुडपी जंगल परिसरात जुगार खेळणाऱ्या सात जणांना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ...
गोंदिया: देवरी तालुक्याच्या शेडेपार शेतशिवार व मरामजोब जुडपी जंगल परिसरात जुगार खेळणाऱ्या सात जणांना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व त्यांच्या चमूने धाड घालून ३ लाख ६४ हजार रूपयाचा माल जप्त केला आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व त्यांच्या चमूने आरोपी उमेश देविलाल शाहू, कवलदिनसिंग जसविंदरसिंग भाटीया, अविनाश सुरजलाल ढवळे, रोशन देवचंद बागवा यांना तास पत्ते खेळतांना पकडले. त्यांच्याजवळून २ मोबाईल व ४३ हजार ९१० रूपये रोख जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार परमानंद नंदागवळी यांच्या तक्रारीवरुन देवरी पोलिसांनी मुंबई जुगारबंदी कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार हिवराज परसमोडे करीत आहेत.
तर दुसरी कारवाई मरामजोब जुडपी जंगल परिसरात त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आली. आरोपी रामेश्वर चरणनदास नागदेवे, चंदू सुदाम मेश्राम, जविदरसिंग भाटीया, प्रफुल सुधाकर राऊत, मनोज अनुर्ध बडोले, संदीप बसिन फुंडे, विकास ईश्वरदास शहारे यांना तास पत्ते खेळताना पकडले. त्यांच्याजवळून ७ मोबाईल, ५ मोटारसायकल, रोख व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ६४ हजार ६५० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस नायक संदीप खडसे यांच्या तक्रारीवरुन देवरी पोलिसांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार ग्यानिराम करंजेकर करीत आहेत.