नवेगावबांध (गोंदिया) : विदेशी पक्ष्यांचे आवडते स्थान म्हणून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची ख्याती आहे. अशातच तालुक्यासाठी गौरवाची बाब म्हणजे, परिसरातील भुरशी तलाव परिसरात दुर्मीळ नदी टिटवी या पक्ष्याची रविवारी (दि.२०) नोंद घेण्यात आली आहे.
नदी टिटवीला ‘River Lapwing’ म्हटले जात असून, शास्त्रीय नाव ‘Vanellus Duvaucelli’ असे आहे. दुर्मीळ नदी टिटवी-सरिता टिटवी मुख्यत: उत्तर पूर्व भारतात नेपाळ, भूतान, पश्चिम मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आदी भागांत मोठ्या नदी किनारी वास्तव्यास असते. नदी टिटवीचा विणीचा हंगाम मार्च ते जूनपर्यंत असतो व ती साधारणत: नदी किनारी जमिनीवर घरटे तयार करून ३-४ अंडी देते. नवेगावबांध परिसरातील भुरशी तलाव परिसरात प्रथमच या दुर्मीळ नदी टिटवीची नोंद झाली आहे.
मुंबई बर्ड रेसनिमित्त रविवारी (दि.२०) आयोजित या रेसमध्ये सहभागी पक्षीमित्र वनरक्षक मिथुन चव्हाण व मृणाली राऊत यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये या पक्ष्यांची ‘E _bird’वर नोंद घेण्यात आली आहे. ही नोंद अभ्यासू पक्षीप्रेमींकरिता पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, २७ डिसेंबर २०२१ रोजी सिरेगावबांध तलावात ‘छोटा क्षत्रबलाक’ (Lesser Adjufand) हा उत्तर पूर्व भारतात आढळणारा पक्षी येथे आढळून आला होता.
नवेगावबांध क्षेत्रातील विदेशी प्रवासी पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी मागील २-३ महिन्यांपासून नवनवीन पक्ष्यांचे आगमन होत आहे. नदी टिटवीबाबतची झालेली नोंद ही पक्षीमित्रांकरिता आनंदात भर घालणारी आहे
-मिथुन चौव्हान, वनरक्षक, नवेगावबांध