केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे परिसर जंगलव्याप्त परिसर आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोबत फाॅयर ब्लोअर मशीन ठेवता ठेवता वनकर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. परंतु यावर्षी या परिसरातील जंगलात आग लागण्याचे प्रमाण घटले आहे.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शनामुळे वन समित्यांच्या माध्यमातून वनकर्मचाऱ्यांचे नागरिकांशी निर्माण झालेले संबंध जंगलातील आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. केशोरी परिसरात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल व तेंदूपत्ता हंगाम सुरु झाला की, मोठ्या प्रमाणात जंगलात आग लावण्याचे प्रमाण दिसून येतात. या आगीमुळे जंगलातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होते याचे परिणाम वनविभागाला भोगावे लागतात. याचे खापर मात्र व्यक्तीश: वन कर्मचाऱ्यांपासून ते वनाधिकाऱ्यापर्यंत फोडल्या जाते. वास्तविक ते रात्रदिवस सेवा अर्जित करण्यासाठी सदैव तत्पर दिसून येतात. जंगलातील वनसंपत्ती आगीमुळे नष्ट होऊ नये म्हणून वन अधिकाऱ्यांसह बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहून जंगलाची काळजी घेऊन निगा ठेवत असतात. यामुळे यावर्षी जंगलात आगी लावण्याचे प्रमाण घटले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच मोहफुल आणि तेंदूपत्ता नवीन पालवी फुटावी म्हणून जंगलात वणवा लावण्याच्या घटना घडत असतात शासनाच्या वनविभागाला आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालावी लागतात परंतु यावर्षी वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या परिसरात आगीचे प्रमाण दिसून आले नाही.