आपत्ती विभागाला द्यावे लागणार वेळोवेळी रिपोर्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:32 PM2019-06-23T22:32:34+5:302019-06-23T22:33:21+5:30
मागील काळातील काही कटू अनुभव पाहता यंदाच्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मंत्रालयास करावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काळातील काही कटू अनुभव पाहता यंदाच्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मंत्रालयास करावे लागणार आहे.
जिल्ह्यात घडलेल्या आपत्तीच्या घटनांची माहिती मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वेळेत दिली जात नसल्याने राज्यासह केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागास त्याचे अहवाल वेळेत देता येत नाही. परिणामी त्यातून मिळणारी सर्वप्रकारची मदतही अपेक्षित वेळेत मिळत नसल्याची तीव्र नाराजी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाच्या प्रमुखांनी व्यक्त केली.तर यंदा पावसाळ्यासह संपूर्ण वर्षभरात कुठेही केव्हाही कुठलीही आपत्तीची घटना घडल्यास त्याची माहिती त्वरीत मंत्रालयातील नियंत्रण कक्षास देण्याचे आदेशही त्यांनी सर्वच जिल्ह्यातील विभागांना दिले आहेत. कक्षांतर्गत जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय विभागांसह बड्या खासगी आस्थापनाही जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अथवा इतर कालावधीत कुठलीही आपत्ती घडल्यास त्याची त्वरीत माहिती या कक्षास मिळते. त्यांच्याकडून लागलीच आवश्यक ती उपाययोजना अन मदतही केली जाते. परंतु राज्यस्तरीय किंवा केंद्रीय मदतीसाठी ही माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षास देणे आवश्यक आहे. पण ती दिलीच जात नाही. या कक्षाला वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा सोशल मिडियावरुन याची माहिती मिळते. त्यातून शासनाला द्यावा लागणारा अहवालही विलंबाने सादर केला जातो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह वेळेत अहवाल सादर करता येत नाही. त्यामुळे आता प्रत्येक घटनेची माहिती देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. यातून काही जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी बाहेर पडले आहेत. त्यांना पुन्हा यात समाविष्ट करुन घेतले जाईल. त्यांनी पुन्हा बाहेर पडू नये, असेही आदेश राज्य नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे यांनी दिले आहेत.