ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात निर्बंध केले शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:27+5:302021-06-01T04:22:27+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केच्या आत आणि ऑक्सिजन बेडची संख्यासुद्धा ४० टक्केपेक्षा ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केच्या आत आणि ऑक्सिजन बेडची संख्यासुद्धा ४० टक्केपेक्षा कमी असल्याने जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. नव्या निर्बंधानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सोमवारी (दि. ३१) जारी करण्यात आले.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णवाढ कायम आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे त्या जिल्ह्यांत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत परवानगी दिली आहे. गोंदिया जिल्हा येलो झोनमध्ये असून जिल्हा पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्केपेक्षा कमी आहे. तर ऑक्सिजन बेडसुद्धा ४० टक्केपेक्षा कमी प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवेची दुकाने मंगळवारपासून (दि. १) सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्वच दुकाने सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. दुकानात मास्कचा वापर, सॅनिटायझेशन तसेच फिजिकल डिस्टन्सिंग, प्रत्येक दुकानासमोर हॅण्डवॉशची व्यवस्था, दुकानात येणाऱ्या ग्राहकाचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुकानदार तसेच त्यांच्याकडील सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने ही दर शनिवार आणि रविवारी बंद ठेवावी लागणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
.....................
दुपारी ३ वाजतानंतर बाहेर पडण्यास मनाई
ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता दुपारी ३ वाजतानंतर बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्क सेवेच्या कामासाठी यात सूट देण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
......
शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती परवानगी
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामे करण्यास १ जूनपासून परवानगी देण्यात आली आहे. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची गरज असल्यास त्यांना यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
............
कृषी विषयक साहित्याची दुकाने ठरवून दिलेल्या वेळेतच सुरू
खरीप हंगाम लक्षात घेता कृषी विषयक साहित्य विक्रीची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आधीच दिली आहे. ती त्याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच त्यांना लागू केलेले नियमसुद्धा कायम राहणार आहेत.
.......
हॉटेल, रेस्टॉरंटला घरपोचची सुविधा
हॉटेल, रेस्टॉरंट यांना जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच यासाठी आधी जे नियम लागू करण्यात आले होते ते सर्वच यापुढेसुद्धा लागू असणार आहेत.
..............
दीड महिन्यानंतर उघडणार दुकानांचे कुलूप
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील दीड महिन्यापासून शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद आहेत. मात्र आता संसर्ग आटोक्यात असल्याने अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर दुकानांचे कुलूप उघडणार असल्याने व्यावसायिकांमध्ये थोडा आनंद आहे.