तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी

By Admin | Published: August 25, 2016 12:03 AM2016-08-25T00:03:50+5:302016-08-25T00:03:50+5:30

गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या परंतू जागा व निधीअभावी रखडलेला तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Rice Process Project | तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी

तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी

googlenewsNext

देवरीत तीन एकर जागा उपलब्ध : मशीन खरेदीसाठी ७.५० कोटी मंजूर
गोंदिया : गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या परंतू जागा व निधीअभावी रखडलेला तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी ५ एकर जागेची मागणी असताना सध्या ३ एकर जागा देवरी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ७.५० कोटींचा निधीही मंजूर झाल्याचे समजते.
या उद्योगामुळे अनेक दिवसांपासून ओस पडलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील देवरी एमआयडीसीत उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून भविष्यात आणखी काही उद्योग येण्याची शक्यता आहे.
देवरी एमआयडीसीमध्ये या उद्योगासाठी सध्या केवळ ३ एकर जागा मिळाली असली तरी त्या जागेलगत जवळपास ४ एकरची जागा अजून उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया उद्योग केंद्राचे तत्कालीन जिल्हा महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते. अजूनही त्यांचे या प्रकल्पाच्या कामावर लक्ष आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर देवरी एमआयडीसी मध्ये इतर प्रकल्प येणे सोयीस्कर होईल, अशी आशा भारती यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)

- गोंदियातील तांदूळ विदेशात
विशेष म्हणजे हा तांदूळ प्रक्रिया प्रकल्प शेतकऱ्यांच्या सहभागातून चालविला जाणार आहे. त्यासाठी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्यातील ५० शेतकऱ्यांचा या उद्योगात सहभाग राहणार आहे.
या प्रकल्पात दररोज ८ टन तांदळावर प्रक्रिया केली जाणार आहे. याच ठिकाणी तांदळाची पॅकेजिंग केली जाईल. तसेच येथील तांदळात गुणवत्ता जपून तो तांदूळ विदेशात पाठविला जाणार आहे.
या प्रक्रिया उद्योगासाठी गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बंगलोर येथील प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच म्हैसूर व तंजावर येथील तांदूळ प्रक्रिया उद्योग पाहण्यासाठी पाठविण्यात आले होते.


दोन जिल्ह्यांचा कारभार पाहतात दोन अधिकारी
उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीकडे अधिकारीच नाहीत. गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमधील औद्योगिक वसाहतींचा संपूर्ण कारभार नागपूर येथील उद्योग विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातूनच पाहिल्या जातो. केवळ आवंटित केलेल्या प्लॉट्समधील बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि उद्योगांना सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यासाठी दोन्ही जिल्हे मिळून गोंदियात एकमेव कार्यालय आहे. या कार्यालयातही केवळ एक उपअभियंता आणि एक सहायक अभियंता असे दोन अधिकारी आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Rice Process Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.