रेल्वे स्टेशनवरच्या 'गरीब भिकाऱ्याची श्रीमंती', मरणोपरांत केलं देहदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 07:53 PM2019-06-27T19:53:30+5:302019-06-27T19:53:39+5:30
सर्वांसमोर ठेवला आदर्श : आयुष्यभर मागणारा, जातांना मात्र देऊन गेला
गोंदिया : रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून भीक मागून आयुष्यभर जीवन जगणाऱ्या एका भिकाऱ्याने मरणोपरांत देहदान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. देहदानाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अद्यापही जनजागृतीचा अभाव असताना त्याने देहदान करुन जाता जाता सर्वांना सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे आयुष्यभर मागणारा जातांना मात्र देऊन गेला हेच शब्द शहरवासीयांच्या मुखात होते.
मंथरा रमेश पुरी (६५) रा. गोंदिया रेल्वे स्थानक असे मरणोपरांत देहदान करणाऱ्या भिकाऱ्याचे नाव आहे. मंथरा आजारी असल्याने बुधवारी (दि.२६) त्याला येथील शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने मंथराची देहदान करण्याची इच्छा होती, असे डॉक्टरांना सांगितले. त्याच्या इच्छेनुसारच मंथराचे देहदान करायचे असल्याचे सांगत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागाकडे देहदानाचा अर्ज त्याच्या सहकाऱ्याने भरुन दिला. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली. मंथराचा सहकारीसुद्धा भिकारीच असून त्याने मंथराची देहदानाची ईच्छा पूर्ण करुन इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. मंथराच्या देहदानामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी त्याची मदत होणार आहे. याशिवाय अनेक असाध्य आजारांवर उपाय शोधून काढण्यास मदत होणार आहे. आयुष्यभर रेल्वे स्थानकावर भिक मागून आयुष्य जगणाऱ्याच्या मनात सुध्दा मरणोपरांत देहदान करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि आयुष्यभर केवळ भिक मागून जीवन जगणाऱ्याने जाताजाता मोठे देहदानासारखे मोठे दान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे मंथरासारख्या भिकाऱ्याचे हे कार्य गोंदिया जिल्हावासीयांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून यामुळे देहदानाप्रती जनजागृती करण्याससुध्दा मोठी मदत होणार आहे.
आतापर्यंत चार जणांचे देहदान
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी दरवर्षी 5 मृतदेहांची गरज असते. मात्र, मागील तीन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाला देहदानामुळे तीन मृतदेह मिळाले होते. त्यानंतर मंथरा यांच्या देहदानामुळे चौथा मृतदेह संशोधनासाठी मिळाला आहे. देहदानाप्रती अद्यापही जागृकतेचा अभाव असल्याने येथील वैद्यकीय महाविद्यालयालाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह आणावे लागतात.
मंथराच्या इच्छेनुसार त्याच्यासोबत राहणाऱ्या सहकाऱ्याने मंथराचा देहदानाचा अर्ज भरुन दिला. त्यानुसार देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एका भिकाऱ्याने मरणोपंरात देहदान करावे ही बाब खरोखर कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणा देणारी आहे.
- व्ही. पी. रुखमोडे, अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया