देवरी तालुक्यातील नदी-नाले व तलाव कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:30 AM2021-07-27T04:30:29+5:302021-07-27T04:30:29+5:30
देवरी : खरिपातील भातपीक व भाजीपाला पिकाला जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील धरण, नदी-नाले व तलाव मात्र पावसाच्या ...
देवरी : खरिपातील भातपीक व भाजीपाला पिकाला जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील धरण, नदी-नाले व तलाव मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील धरणांमध्ये पूरक पाणी नसल्यामुळे शेतीसाठी पाण्याची समस्या कायम आहे.
तालुक्यात जुलै महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली असली तरी दमदार पाऊस बरसला नसून रिमझिम पावसानेच हजेरी लावली आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन आता दोन महिने होत असतानाही समाधानकारक पाऊस बरसलेला नाही. आतापर्यंत सरासरीच्या ६० टक्के पाऊस तालुक्यात पडला; मात्र पाऊस जोरदार नसल्यामुळे पडलेला पाऊस जमिनीत मुरला व शेतात पाणी साचले नाही. परिणामी नदी-नाल्यांना पूर व तालुक्यातील जलस्त्रोतांना पाणी आलेले नाही. परतीचा पाऊस सुरू झालेला असताना नदी-नाले, पाझर तलाव, लघु तलाव, मध्यम प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात जुलै महिन्यात देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे दार उघडले जायचे; मात्र यंदा या भागात पाऊस कमी असल्याने धरणाची दारे बंदच आहेत. सध्या काहीअंशी पडलेल्या पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असली तरी भविष्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर डिसेंबरपासून तालुक्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.