खासगी शाळांकडून सक्तीच्या नावावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 09:12 PM2018-06-23T21:12:28+5:302018-06-23T21:32:27+5:30

आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून घेतला जात आहे.

Robbery in private name by private schools | खासगी शाळांकडून सक्तीच्या नावावर लूट

खासगी शाळांकडून सक्तीच्या नावावर लूट

Next
ठळक मुद्देअतिरिक्त शुल्काची आकारणी : शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका, पालकांची गळचेपी

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून घेतला जात आहे. शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतूनच घेण्याची सक्ती व त्यावर अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची त्यांच्याच डोळ्यादेखत लूट सुरू आहे. मात्र आपल्या पाल्याचे नुकसान होवू नये, म्हणून पालक हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे.

जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेरुन पुस्तके खरेदी करावी लागतात. सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम देखील वेगवेगळा आहे. या अभ्यासक्रमांची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहे. पण, खासगी इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी कमिश्नखोरीकरिता शाळेतच पाठपुस्तके व इतर साहित्याचे दुकाने लावून तिथूनच पाठपुस्तकांची खरेदी करण्याची सक्ती केली आहे. शाळांमधून पुस्तके घेतली नाही तर पालकांना धमकाविण्याचे प्रकार सुध्दा काही शाळांमध्ये सध्या सुरु आहेत. त्यामुळे पालक सुध्दा आपला पाल्य नामाकिंत शाळेतील प्रवेशापासून वंचित राहू नये, त्याला वर्षभर शाळा व्यवस्थापनाकडून त्रास व्हायला नको, म्हणून पालक देखील हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे. मात्र दरवर्षी खासगी शाळांमध्ये पाठपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीच्या नावावर अक्षरक्ष: लूट केली जात आहे. ज्या पाठ्यपुस्तकांचे दर बाजारपेठेत कमी आहे. तीच पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना अतिरिक्त दर आकारुन विक्री केली जात आहे. एखाद्या पालकांने यावर ओरड केल्यास त्यांना परवडत नसेल तर शाळेत प्रवेश घेवू नका, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पालकांचा सुध्दा नाईलाज आहे. मागील वर्षी शैक्षणिक सत्रादरम्यान खासगी शाळांनी पाठपुस्तकांच्या नावावर सुरू केलेल्या लूटमारी विरोधात पालकांनी आवाज उठविल्यानंतर न्यायालयाने दखल घेत शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी सक्ती न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही खासगी शाळांमधून दुकानदारी बंद करुन विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास सांगितले जात आहे. सक्तीच्या नावावर कमिश्नखोरी व पालकांची लूट मात्र कायम आहे.
शाळांची चलाखी
शहरातील एका नामाकिंत खासगी शाळेत सध्या सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. सीबीेएसई इयत्ता पाचवी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या संचाचे शुल्क ३ हजार ९९८ रुपये आकारले जात आहे. मात्र या संचाची बाजारपेठेत किंमत केवळ ३ हजार रुपये आहे. शाळेने पुस्तकावर प्रिंट केलेल्या किंमतीच्या बाजुला स्टॉम्प मारून त्यावर ८० ते ९० रुपये अतिरिक्त आकारुन स्टॅम्प मारुन एक प्रकारे लूट सुरू केल्याचे चित्र आहे.
शाळेतूनच खरेदीची सक्ती का?
सीबीएसईसह इतर अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्यांचे दर देखील शाळांमधून मिळणाऱ्या पुस्तकांपेक्षा कमी आहे. मात्र खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतानाच शाळेतून पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागेल, अशी सक्ती केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना नाईलाजास्तव अतिरिक्त पैसे मोजून शाळेतूनच पुस्तके खरेदी करावी लागत आहे.
दरवर्षी नवीन गणवेश व बुटांची सक्ती
पाठपुस्तकांच्या सक्तीसह दरवर्षी गणवेशात शाळांकडून बदल केला जात आहे. तसेच कॉन्व्हेंटपासून इयत्ता आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळे गणवेश आणि दरवर्षी नवीन बुट घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पालकांचे बजेट बिघडले
खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कात व पाठपुस्तकांच्या दरात दरवर्षी वाढ केलीे जात आहे. केजी वन किंवा केजी टू मध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी २० ते २५ हजार रुपये शुल्क आणि पाठपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे ८ ते १० हजार रुपये लागत असल्याने पालकांचे बजेट पूर्णपणे बिघडले असून दिवसेंदिवस खासगी शाळांमध्ये पाल्यांना शिकविणे कठीण झाले आहे.
लाखो रुपयांची उलाढाल
खासगी शाळांमध्ये पाठपुस्तके शाळांमधून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. गोंदिया शहरात ४० वर खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून यामध्ये २० हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. एका विद्यार्थ्याच्या पाठपुस्तकांच्या संचामागे काही शाळा हजार रुपयांच्यावर शुल्क आकारात आहे. तर काही शाळांनी विशिष्ट दुकाने निश्चित करुन स्वत:चे कमिश्न ठरविले आहे. यातून शाळा व्यवस्थापन लाखो रुपयांचे कमिश्न लाटत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका
खासगी शाळांकडून पाठपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करुन पालकांची लूट केली जात आहे. याबाबत पालकांची ओरड सुध्दा सुरू आहे. मात्र अद्यापही शिक्षण विभागाने याची साधी चौकशी करुन एकाही शाळेवर कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाºयांप्रती पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. तर काही पालकांनी जिल्हाधिकाºयांनी खासगी शाळांना भेट देवून कारवाईची करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: Robbery in private name by private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.