विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
By Admin | Published: September 6, 2016 01:46 AM2016-09-06T01:46:57+5:302016-09-06T01:46:57+5:30
आदर्श शिक्षक म्हटले की साने गुरूजी आठवतात. शिक्षकी पेशाला मोठी परंपरा आहे. आज जगात ज्ञानाची
पालकमंत्री बडोले : शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा गौरव
तिरोडा : आदर्श शिक्षक म्हटले की साने गुरूजी आठवतात. शिक्षकी पेशाला मोठी परंपरा आहे. आज जगात ज्ञानाची क्रांती झाली असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या अनेक समस्या असल्या तरी त्यावर मात करून त्यांनी आपले काम योग्य प्रकारे करावे, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ सोमवारी शिक्षक दिनानिमित्त स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आ.विजय रहांगडाले यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना.बडोले बोलत होते. आ.विजय रहांगडाले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले होते. यावेळी आ.गिरीष व्यास, माजी आ.भजनदास वैद्य, हरिष मोरे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, भाजपा अध्यक्ष हेमंत पटले, जि.प.सदस्य रजनी सोयाम, पवन पटले, रमनिक सोयाम, हितेंद्र लिल्हारे, माधुरी टेंभरे आदी मंचावर विराजमान होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात खा.पटोले म्हणाले, आजच्या स्थितीत आपण विचार केला असता भंडारा व गोंदिया जिल्हा शिक्षणात मागे पडला आहे. शिक्षणात खूप मोठे बदल होत आहेत. शिक्षण प्रणालीत झालेले बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी शिकविले पाहिजे.
धापेवाडा टप्पा-१ व २ पूर्ण झाले पाहिजे. अजूनही तलावात पाणी पडले नाही. त्यामुळे शेतात पाणी पोहोचू शकले नाही. वैनगंगेचे पाणी शेतात आलेच पाहिजे. लवकरच खळबंदा तलावात पाणी पडेल. काही विभागाच्या परवानग्या बाकी होत्या त्या प्राप्त झालेल्या आहे. अदानी प्रकल्पाने मात्र स्थानिकांचा नोकऱ्याबाबत अपेक्षाभंग केला, असे ते म्हणाले.
आ. विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. विकास कामे केलीत, न.प.ला ९ कोटी विकासासाठी आणून दिले. शिक्षकांच्या माध्यमातून शासकीय विविध योजनांची खेड्यापर्यंत पोहचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून गुरूचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही असे त्यांनी सांगितले. संचालन माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांनी तर आभार प्रदर्शन अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृऊबासचे मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ.वसंत भगत, संजू बैस, भाऊराव कठाने, पिंटू रहांगडाले, चत्रुभूज बिसेन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचाही गौरव
४या कार्यक्रमात तिरोडा तालुक्यातून पहिल्या तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात भिवरामजी विद्यालयाच्या पूनम बडगे, श्रीया असाटी यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक व आदर्श शिक्षक यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.