गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना चाचणी केंद्रावर मागील दोन दिवसांपासून आरटीपीसीआर आणि रॅट किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. किटअभावी कोरोना चाचण्या खोळंबल्या असून, चाचणी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना चाचणी न करताच केंद्रावरून परतावे लागत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून कायम आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व त्याला वेळीच पायबंद घालण्यासाठी कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्यात आला. जनजागृतीमुळे नागरिकसुद्धा आता स्वत:हून चाचण्या करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र होते; पण मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि शहरातील कोरोना चाचणी केंद्रांवर चाचणी करण्यासाठी आवश्यक असणारे आरटीपीसीआर आणि रॅट किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून किटचा पुरवठा न झाल्याने मागील दोन दिवसांपासून आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट पूर्णपणे टप्प आहेत. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच नागरिक तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व कोरोना चाचणी केंद्रांवर जात आहेत. मात्र, त्यांना किट नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कोरोना चाचण्या ठप्प झाल्याचे चित्र आहे. चाचणी न करताच परतावे लागत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे कुटुंबीयसुद्धा दहशतीखाली वावरत आहेत.
......
कोरोनाला कसे रोखणार?
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून लक्षणे दिसताच चाचणी करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. याला प्रतिसाद देत नागरिकसुद्धा चाचणी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील दोन दिवसांपासून रॅट किट नसल्याने नागरिकांना ग्रामीण रुग्णालयातून परत यावे लागत असल्याने मनस्ताप वाढत आहे.
...........
कोट
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी रॅट किटचा पुरवठा करण्यासाठी ४० हजार किटची मागणी करण्यात आली आहे. मात्र, पुरवठा न झाल्याने समस्येत वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत किट प्राप्त होण्याची शक्यता असून, लवकरच केंद्रांना किटचा पुरवठा केला जाईल.
-डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी