रस्त्यावर धावतोय यमदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:46 PM2019-06-19T23:46:25+5:302019-06-19T23:49:21+5:30
परिवहन विभागाने काळी-पिवळी टॅक्सीला ९ अधिक १ असा परवाना दिला असला तरी प्रत्यक्षात कावळी पिवळी चालक १५ ते २० प्रवासी भरुन वाहतूक करीत आहे. केवळ पैसे कमविण्याच्या नादात वाहनांच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परिवहन विभागाने काळी-पिवळी टॅक्सीला ९ अधिक १ असा परवाना दिला असला तरी प्रत्यक्षात कावळी पिवळी चालक १५ ते २० प्रवासी भरुन वाहतूक करीत आहे. केवळ पैसे कमविण्याच्या नादात वाहनांच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांवरुन २९३ काळी पिवळी वाहनाच्या रूपाने चक्क रस्त्यावरुन यमदूत धावत आहे. मात्र नियमांचे उल्लघंन करुन धावणाऱ्या वाहनांवर कारवाही करण्याकडे वाहतूक नियंत्रण विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सुध्दा पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात भरधाव काळी पिवळी वाहन चूलबंद नदीत कोसळून ६ जण ठार तर ७ जण गंभीर जमखी झाल्याची घटना मंगळवारी घडली. काळी पिवळी वाहनाचा टायर फुटल्याने वाहन चालकाचे नियंत्रण जावून हा अपघात घडल्याची माहिती आहे. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा काळी पिवळी वाहनाच्या अवैध प्रवाशी वाहतुकीवर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठ वर्षांपूर्वी असाच काळी पिवळी वाहनाचा अपघात तिरोडा तालुक्यात झाला होता.
यात १७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र या अपघातानंतरही काळी-पिवळी वाहन चालकांनी कसलाच धडा घेतला नसून अधिक पैसे कमविण्याच्या आणि इतर वाहन चालकांशी स्पर्धा करण्याच्या नादात प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू आहे.
अद्यापही जिल्ह्यातील बहुतेक गावांत एसटी बस जात नाही. तर बसेसचे वेळापत्रक निश्चित असल्याने प्रवाशी त्यांच्या नियोजीत ठिकाणी पोहचण्यासाठी काळी-पिवळी वाहनाचा आधार घेतात. मात्र काळी पिवळी चालक प्रवाशांच्या गरजेचा फायदा घेतात. जिल्ह्यात एकूण २९३ काळी-पिवळी परवानाधारक वाहने आहेत.
या वाहनाना ९ अधिक १ असा प्रवाशी वाहतुकीचा परवाना परिवहन विभागाने दिला आहे. मात्र काळी-पिवळी चालक अधिक लालसेपोटी वाहनामध्ये १५ ते २० प्रवाशी भरतात. प्रवाशांना अक्षरक्ष: वाहनांमध्ये कोंबले जाते.
विशेष म्हणजे या वाहनांमध्ये चालकाला बसण्यासाठी सुध्दा कधी कधी अपुरी जागा असते. यापैकी काही वाहने जीर्ण झाली असली तरी ती अद्यापही रस्त्यांवरुन धावत आहेत.
या काळी पिवळी वाहन चालकांचे लक्ष केवळ पैसे कमविण्याकडे असून वाहनाच्या देखभाल दुरूस्तीकडे त्यांचे लक्ष् नाही.
त्यामुळेच ही वाहने एकप्रकारे यमदूत बनून रस्त्यावरुन धावत आहेत. याच दुर्लक्षीतपणामुळे मंगळवारी भंडारा जिल्ह्यात काळी पिवळी वाहनाचा अपघात घडला आणि ६ प्रवाशांना आपला नाहक जीव गमवावा लागला. मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये चार विद्यार्थिनीचा सुध्दा समावेश आहे. त्या नुकत्याच बारावी उत्तीर्ण झाला होत्या.
बीएच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे जात होत्या मात्र काळी पिवळी वाहन चालकाच्या दुर्लक्षितपणाच्या त्या बळी ठरल्या. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करणाºया या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आता सर्वच स्तरातून केली जात आहे. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या अपघातानंतर वाहतूक नियंत्रण विभाग जागा होवून कार्यवाई करतो याकडे लक्ष आहे.
पोलिसांच्या डोळ्यादेखत वाहतूक
काळी पिवळी वाहनांचे जाळे संपूर्ण जिल्हाभरात आहे. गोंदिया येथील जयस्तंभ चौकात वाहतूक नियंत्रण विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरच काळी पिवळी चालक वाहनांमध्ये १५ ते २० प्रवासी भरुन वाहतूक करतात. मात्र यानंतरही वाहतूक नियंत्रण विभागातर्फे त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे वाहन चालक सर्रासपणे नियमाचे उल्लघंन करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत. या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
दरवर्षी वाहनाची फिटनेस तपासणी आवश्यक
काळी पिवळी परवानाधारक वाहनांना दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्या वाहनांचा परवाना निलंबित केला जातो. मात्र जिल्ह्यातील २९३ काळी पिवळी वाहनांपैकी बºयाच वाहन चालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याची माहिती आहे.त्यामुळे ही धोकादायक वाहने अद्यापही रस्त्यांवरुन धावत आहेत.
अपघातानंतर रस्त्यावरुन काळी-पिवळी वाहने गायब
भंडारा येथे मंगळवारी काळी पिवळी वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर काळी पिवळी परवानाधारक वाहने आणि अवैध प्रवाशी वाहतुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला. दरम्यान या घटनेमुळे बुधवारी (दि.१९) वाहनांवर कारवाई होण्याच्या भितीने जिल्ह्यातील काळी पिवळी चालकांनी आपली वाहने घरीच उभी ठेवली होती. त्यामुळे रस्त्यावरुन काळी पिवळी वाहने गायब झाल्याचे चित्र जिल्ह्यात बुधवारी दिवसभर होते.
प्रवाशी सुद्धा जबाबदार
काळी-पिवळी वाहन चालक आपल्या वाहनांमध्ये नियमांचे उल्लघंन करुन १५ ते २० प्रवाशी भरतात. बरेचदा वाहनांमध्ये बसण्यासाठी जागा सुध्दा नसते. तर काही जीर्ण झालेली वाहने रस्त्यांवरुन धावत आहे. मात्र या वाहनांमधून प्रवास करणे टाळण्याची गरज असता प्रवासी सुध्दा धोका पत्थकारुन या वाहनांमधून प्रवास करतात. त्यामुळे प्रवासी सुध्दा याला तेवढेच जबाबदार आहेत.
१५ काळी पिवळी वाहनांचा परवाना निलंबित
उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाºया जिल्ह्यातील १५ काळी पिवळी वाहनांवर निलंबनाची कारवाही केली आहे. ही वाहने सध्या जप्त करुन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
वाहन चालकांना अभय कुणाचे
काळी पिवळी वाहन चालक आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहन चालक नियमांचे उल्लघंन करुन सर्रासपणे वाहतूक करीत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू पोलीस आणि उपप्रादेशिक विभागाच्या डोळ्यादेखत सुरू आहे. मात्र यानंतरही त्यांच्यावर कुठलीच कारवाही केली जात नाही. त्यामुळे या वाहन चालकांना नेमके अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.