जिल्ह्याचा ग्रामीण भाग सावरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 AM2021-01-23T04:29:32+5:302021-01-23T04:29:32+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असलेला दिसून येत असून झपाट्याने वाढलेली बाधितांची संख्या सातत्याने कमी होत असताना दिसत ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असलेला दिसून येत असून झपाट्याने वाढलेली बाधितांची संख्या सातत्याने कमी होत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, काही तालुक्यांत आता नवीन बाधितांची नोंद नाही. यावरून जिल्ह्यातील काही तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसून येत आहे.
मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशातच कोरोनाने कहर केला आहे. यापासून जिल्हाही सुटला नसून जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार पार झाली आहे. मध्यंतरी, दररोज बाधितांची आकडेवारी तीन अंकांमध्ये नोंदली जात होती. मात्र, आता परिस्थिती सुधारली असून आता बाधितांची संख्या एक अंकावर आली आहे. यामुळे कोरोनाचा आता परतीचा प्रवास सुरू झाल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. त्यातही दिलासादायक बाब अशी की, काही तालुक्यांत मागील काही दिवसांपासून नवीन बाधितांची नोंद नाही. नोंद असल्यासही मोजकेच १-२ बाधित येत असल्याने ग्रामीण भागातील स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.
गुरुवारची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात आठ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यातही गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यांंतच या बाधितांची नोंद आहे. म्हणजेच, आता ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळेच आता काही तालुक्यांत १० च्या आत क्रियाशील रुग्ण असून हे तालुके लवकरच कोरोनामुक्त होणार, यात शंका नाही.
-----------------------
गोंदिया तालुका आघाडीवरच
कोरोनाचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यापासूनच गोंदिया शहर व तालुका आघाडीवर आहे. हीच स्थिती आजही कायम असून गोंदिया तालुक्यात ६६५९ बाधितांची नोंद घेण्यात आली असून आजही ८४ रुग्ण क्रियाशील आहेत. तर, दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीतही सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यातच नोंदले जात आहेत. यामुळे आताही तालुकावासीयांनी उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे दिसून येत आहे.