कारवाईची गरज : विक्रेत्यांची अनियमिततागोंदिया : खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना आता बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र काही भागात कृषी केंद्र संचालकांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण न करताच शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री सुरू केली आहे. या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम २०१६ अंतर्गत १.९० लाख हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन केले आहे. या हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने भात पिकांची लागवड करण्यात येत असल्याने विविध वाणाचे ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करून दिले आहे. मात्र ज्या विक्रेत्यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही त्यांनीही राजरोसपणे बियाणे विक्री सुरू केली आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा वापर केला जात आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत रासायनिक खताचे ८२६, बियाण्यांचे ४९९ व कीटकनाशकांचे ४५३ नोंदणीकृत परवानाधारक कृषी निविष्ठा विक्री केंद्र कार्यरत आहेत. मात्र काही परवानाधारकांनी नूतनीकरण केले नसल्यामुळे त्यांनी विक्री करणे अनधिकृत ठरत आहे. याप्रकरणी कृषी विभागाकडे संपर्क केला असता, अशा विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणी करून नूतनीकरण न करताच मालाची विक्री करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
नूतनीकरण न करताच कृषी केंद्रांकडून विक्री
By admin | Published: June 05, 2016 1:28 AM