गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरा, काटी, फुलचूर, फुलचूर टोला, कारंजा, कुडवा ग्रामपंचायत येथे जनसुविधा योजनेच्या ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समितीतून मंजुरी देण्यात आली आहे. या कामांना मंजुरी मिळावी यासाठी माजी. आ. गोपालदास अग्रवाल यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
मंजुरी मिळालेल्या कामांमध्ये ग्रामपंचायत काटी ६५ लाख ५० हजार, कटंगीकला ७१ लाख रुपये, फुलचूर टोला ६८ लाख, फुलचूर ९७.५० लाख, ग्रामपंचायत कारंजा येथे ५७ लाख रुपये, कुडवा ७१ लाख रुपयांच्या विविध विकास कामे करण्यात येणार आहे. नागरी व जनसुविधा योजनेंतर्गत सर्व प्रथम ग्रामपंचायतची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जातो. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी ७ ग्रामपंचायतच्या विकास कामांना मंजुरी देण्यात यावी यासंदर्भात पालकमंत्री नवाब मलिक व जिल्हाधिकारी नयना गुंडे, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुराम आणि खंड विकास अधिकारी खोटेले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर या योजनेसाठी संपूर्ण जिल्हा करिता १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी अग्रवाल यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.