सरपंचावर बनावट टीसी घेतल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:40+5:302021-05-06T04:30:40+5:30
गोंदिया: शासकीय जागेवर अतिक्रमण करणारा व बोगस टीसी बनवून जातपडताळणी प्रमाणपत्र घेण्याच्या तयारीत असलेल्या शिलापूर येथील सरपंचाला पायउतार करा. ...
गोंदिया: शासकीय जागेवर अतिक्रमण करणारा व बोगस टीसी बनवून जातपडताळणी प्रमाणपत्र घेण्याच्या तयारीत असलेल्या शिलापूर येथील सरपंचाला पायउतार करा. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावातील मुन्ना काशिराम टेंभूरकर (५१) यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याकडे केली आहे.
जानेवारी, २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत गरिबा कोंडू टेंभूरकर (६४) हे फेब्रुवारी महिन्यात सरपंच झाले. त्यांनी आपले वडील कोंडू फागू टेंभूरकर यांच्या नावाने केंद्रीय पूर्व प्राथमिक शाळा देवरी येथे सन १९३३ ते १९३८ या दरम्यान शाळा शिकल्याची बोगस टीसी मिळवून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोंडू फागू टेंभूरकर हे कोणत्याच शाळेत शिकले नाही, असे मुन्ना टेंभूरकर यांचा आरोप आहे. कोंडू टेंभूरकर मध्य प्रदेश राज्याचे मूळ रहिवासी होते. त्यांचे जन्मगाव शिलापूर दाखविण्यात आले आहे. शासनाच्या व नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकून निवडणूक जिंकून सरपंच झाल्याचा आरोप केला आहे. त्याच्या उमेदवारी अर्जाची फेर तपासणी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी, मुन्ना काशिराम टेंभूरकर यांनी जिल्हाधिकारी गोंदिया, निवडणूक अधिकारी, जातपडताळणी प्रमाणपत्र समिती व आपले सरकार संकेतस्थळावरून शासनाकडे केली आहे.