सरपंच-सचिवाला १.१४ लाखाचा दंड
By admin | Published: March 4, 2016 01:56 AM2016-03-04T01:56:06+5:302016-03-04T01:56:06+5:30
एकोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात २० ते ३० ब्रास मुरूम एकोडी ग्रामपंचायत मार्फत टाकण्यात ला.
गोंदिया : एकोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात २० ते ३० ब्रास मुरूम एकोडी ग्रामपंचायत मार्फत टाकण्यात ला. मात्र सरपंच-सचिवांनी त्यासाठी रात्रीला उत्खनन करून कायद्याचा भंग केला. त्यामुळे तहसीलदार गोंदिया यांच्या न्यायालयाने त्यांच्यावर एक लाख १४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्याचा आदेश पारित केला.
प्राप्त माहितीनुसार, या उत्खननाबाबत एकोडीचे तलाठी एस.आर. राठोड यांनी प्रतिवेदन व पंचनामा सादर केला. त्यात जि.प. हायस्कूल एकोडी येथे ग्रामपंचायत मार्फत अंदाजे २० ते ३० ब्रास मुरूम टाकण्यात आल्याचे नमूद आहे. तसेच पं.स. सदस्य जयप्रकाश टेकचंद बिसेन व पोलीस पाटील यांच्या सुपूर्तनाम्यावर देण्यात आल्याचेही नमूद आहे. प्रकरणात सरपंचाने वाहतूक परवाने सादर केले. त्यानुसार सदर वाहतूक परवान्याच्या तपासणीबाबत नायब तहसीलदार अहवाल सादर करण्यात आला. ग्रामपंचायत एकोडीच्या नावे २१, २२, २३, २४ व २५ आॅक्टोबर २०१५ रोजी वाहतूक पास परवाना देण्यात आलेले आहेत.
परंतु तलाठी यांच्या पंचनाम्यानुसार, सदर मुरूम रात्री टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व त्याखालील नियमांनुसार गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूक सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान करणे आवश्यक आहे.
मात्र सरपंचाने सदर उत्खनन रात्री करून कायद्याचा भंग केला. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन अधिनियमान्वये एक लाख दोन हजार रूपयांचा दंड व स्वामीत्वधन १२ हजार रूपये असे एकूण एक लाख १४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश तहसीलदार संजय पवार यांनी पारित केले. (प्रतिनिधी)