महिलेच्या खुन्यास सात वर्षांची शिक्षा

By Admin | Published: August 25, 2016 12:09 AM2016-08-25T00:09:19+5:302016-08-25T00:09:19+5:30

खर्ऱ्याच्या पैशावरून झालेल्या वादात महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्या महिलेचा मृत्यू झाला.

Seven years of punishment for women's murder | महिलेच्या खुन्यास सात वर्षांची शिक्षा

महिलेच्या खुन्यास सात वर्षांची शिक्षा

googlenewsNext

गोंदिया : खर्ऱ्याच्या पैशावरून झालेल्या वादात महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे.
देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणारे शेंडा कोयलारी हे गाव सडक-अर्जुनी तालुक्यात आहे. या गावात २ जानेवारी २०१३ रोजी सकाळी १० वाजतादरम्यान ही घटना घडली होती. यात आरोपी सुभाष ददशरथ राऊत (३२) रा. कोयलारी हा खर्रा घेण्यासाठी तिर्थराज ललीतकुमार बडोले (२३) रा. शेंडा-कोयलारी यांच्या दुकानात गेला. त्याने खर्रा घेऊन १० रूपये दुकानदाराला दिले. त्यावर खर्ऱ्याचे जुने बाकी असलेले २० रूपये तिर्थराजने मागितल्यावर त्याने आता १० रुपये दिले उर्वरीत नंतर देईल असे म्हटले. या संभाषणातच त्या दोघांचा वाद सुरू झाला.
त्यांच्यातील जोरदार वाद सुरू असताना आवाज ऐकून घरात असलेली तिर्थराजची आई निर्मला उर्फ रेखा ललीतकुमार बडोले (४८) ह्या घराबाहेर येत होत्या. याचवेळी आरोपी सुभाष दशरथ राऊत (३२) याने तिर्थराजला दगड फेकून मारला. परंतु तो दगड त्याला न लागता निर्मलाच्या कंबरेवर लागला. त्यानंतर पुन्हा निर्मला व तिर्थराजला मारहाण केली. यात निर्मला सिमेंट नालीवर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार केल्यावर पुढील उपचारासाठी गोंदियात हलविले असता उपचार घेताना तिचा मृत्यू झाला.
देवरी पोलिसांनी या घटनेसंदर्भात सुभाषविरूध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी केला होता. यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. त्रिवेदी यांनी सुनावणी केली.
सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रशांत डोये यांनी काम पाहिले. यात आरोपीला कलम ३०४ अन्वये ७ वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएससेलच्या महिला पोलीस शिपाई आशा मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seven years of punishment for women's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.