गोंदिया : जिल्ह्यातील दुर्गम भाग, भौगोलिकदृष्ट्या विपरित परिस्थिती, वीज बिल भरण्याचीही सोय नसलेल्या ग्रामपंचायती, अशी एकूण परिस्थिती असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे आव्हान स्वीकारून ते पूर्ण केले. जिथे नळ योजना यशस्वी करणे अशक्यच झाले होते तिथे ‘सोलर पंपा’चा पर्याय रामबाण ठरत आहे. पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. शहरी भागात अगदी घरातील स्वयंपाकघरात थेट नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी ग्रामीण भागात आणि त्यातही दुर्गम अशा डोंगराळ, जंगलाने व्यापलेल्या आणि नक्षली कारवायांनी कायम दहशतीत वावरणाऱ्या लोकांना मात्र घोटभर पिण्याच्या पाण्यासाठीही कितीतरी पायपीट करावी लागते. काही भागात भौगोलिक परिस्थितीमुळे नळाची पाईपलाईन टाकणे शक्य होत नाही. काही ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य असले तरी त्या पाण्याचा कर भरणेही तेथील नागरिकांच्या ऐपतीत नाही. त्यामुळे वीज बिल भरणे अशक्य होऊन नळ योजनाच बंद पडण्याची स्थिती अनेक ठिकाणी निर्माण होते. मात्र आता यावर प्रभावी पर्याय ठरले आहे ते म्हणजे सौरउर्जेवर चालणाऱ्या हापशी.गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तब्बल २९२ सोलर पंप लावण्यात आले आहेत. सौरउर्जेवर चालणाऱ्या मोटरने या पंपामधील पाणी ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत जाते. तेथून खाली लावलेल्या नळांमधून ते पाणी गावकऱ्यांना वापरता येते.नागरिकांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविणे आणि वीज पुरवठ्याअभावी बंद पडणाऱ्या नळ योजनांची डोकेदुखी दूर करणे हा या सौरपंपांचा उद्देश होता. त्यात आता बऱ्याच प्रमाणात यश आल्याचे समाधान ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत यांत्रिकी विभागाचे उपअभियंता मानकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)‘जीपीएस सिस्टम’मधून होणार नवीन क्रांती४जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सौरपंपांना आता जीपीएस सिस्टम जोडण्याचा नवीन प्रयोग केला जात आहे. जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम पाच ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागात भारनियमन मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय सोलर पंपातून पाणी पुरवठा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती दुर्गम भागातील लोक जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. जीपीएस सिस्टममुळे मात्र सर्व प्रकारची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.सोलरपंपांना जीपीएस सिस्टम लावण्यासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणे झाले. आम्हाला काय अपेक्षित आहे हे त्यांना सांगितले. त्यानुसार काही ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. तो यशस्वी ठरल्यास राज्यासाठी तो दिशादर्शक ठरेल.- एन.एस.मानकरउपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प.गोदिया
पाणी टंचाईवर सोलर पंप वरदान
By admin | Published: March 22, 2016 2:20 AM