गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष जिल्हा किसान आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.९) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेेदनात, ई-पीक नोंदणी ॲपची क्लिष्ट अट तत्काळ रद्द करावी, खरीप हंगामात पावसाअभावी रोेवणी न झालेल्या शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, गादमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या धानपिकाची पाहणी करून नुुकसानभरपाई देण्यात यावी, धडक सिंचन विहीर योजनेचे प्रलंबित चुकारे शेतकऱ्यांना तातडीने द्यावे, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्यावर कारवाई करण्यात करून युरिया उपलब्ध करण्यात यावा, कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, थकीत कृषिपंपाची जोडणी धानपीक परिवक्व होईपर्यंत कापू नये व थकबाकी माफ करावी, रानडुकराच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी आदी मागण्या नमूद आहेत.
निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, गोपालदास अग्रवाल, खोमेश रहांगडाले, रमेश कुथे, भेरसिंग नागपुरे, नेतराम कटरे, संजय कुलकर्णी, संजय टेंभरे, भावना कदम, हनवत वट्टी, दीपक कदम, धनलाल ठाकरे, भाऊराव कठाने, साहेबलाल कटरे, अशोक लंजे, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, पंकज रहांगडाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिला असून, सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी पडल्यामुळे धानपिकाची रोपे गंभीर अवस्थेत आहेत. ही स्थिती बघता यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने चित्र दिसून येत आहे. अशात पंचनामे करून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणीही भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.