गोंदिया : डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाने संपविलेल्या रोजगारावर आणखीनच संकट ओढवण्याचे काम पेट्रोल व डिझेल दरवाढीने केले आहे. जिल्ह्यात २ हजार ऑटो रिक्षा आहेत. त्यातील ९० टक्के रिक्षा डिझेलवर चालणाऱ्या आहेत. परंतु डिझेलच्या वाढत्या दरामुळे २ हजार ऑटो रिक्षाचालकांवर बेरोजगारीचे संकट ओढवत आहे. कोरोनामुळे एकमेकांच्या जवळ येऊ नका, दाटीवाटीने प्रवास करू नका, अशा सूचना प्रशासनाने दिल्यामुळे ऑटो व्यावसायिक संकटात आले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊनच्या काळात ऑटो बंद होते. दोन ते अडीच महिने बंद असलेल्या ऑटोमुळे आधी कमावलेले पैसे गरजा भागविण्यात संपले. लॉकडाऊन शिथिल झाला आणि ऑटोचालकांना दोन ते तीन प्रवासी वाहून नेण्याची मुभा मिळाली. जुन्याच दरात प्रवाशांची वाहतूक करावी लागत असताना दोन प्रवाशांना नेऊन डिझेलचे पैसे काढून आपले घर चालविण्यापर्यंतची मिळकत मिळत नसल्याने ऑटो रिक्षाचालकांची फसगत होत आहे. अनेकांनी पोट भरण्यासाठी पर्यायी काम शोधले. परंतु आधीच कोरोनामुळे अनेकांच्या हातातील काम गेल्यामुळे ऑटोचालकांना दुसरे कामही मिळत नसल्याची खंत ऑटोचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
बॉक्स
दरवाढीमुळे व्यवसायावर परिणाम
डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ऑटो रिक्षाचालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच कोरोनाच्या मारामुळे हतबल झालेल्या ऑटो रिक्षाचालकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ सहन करावी लागत आहे. प्रवासी मिळत नसताना दिवसाला ३०० रुपये मोठ्या मुश्किलीने मिळतात. त्यातून डिझेल-पेट्रोलचे पैसे काढून घर कसे चालवावे, ही चिंतेची बाब ऑटो रिक्षाचालकांवर आहे.
बॉक्स
पैसे उरत नसल्याने इतर कामांचा शोध
ऑटो रिक्षाकडे प्रवाशांचा ओढ कमी असल्याने रिक्षाचालकांना प्रवासी मिळत नाहीत. कमी प्रमाणात आलेल्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या मिळकतीतून घर चालविणे कठिण असल्याने अनेक ऑटोचालकांनी इतरही कामे करणे सुरू केले आहे. कोरोनाच्या संकटाने अनेकांचा रोजगार हिरावल्याने आता दुसरे काम मिळणेही कठिण झाले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न ऑटोचालकांना पडला आहे.
कोट
कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत आमच्या रोजगारावर संकट आले. आधी आपली रोजी-रोटी चांगली सुरू होती. परंतु आता ऑटो रिक्षाकडे ग्राहकच भटकत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
सतीश समुद्रे
अध्यक्ष, ऑटो रिक्षाचालक संघटना
कोट
कोरोनाच्या संसर्गामुळे लोक अधिक पैसे खर्च करून स्वत:च्या वाहनाने प्रवास करू लागले. या प्रवासात त्यांना जास्त खर्च येत असला तरी ते आपल्याच वाहनाचा वापर करतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर संकट ओढवले आहे.
नंदू लांजेवार, खमारी
कोट
बहुतांश रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेस्थानकावरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या नाहीच्या तुलनेत आहे. त्यामुळे ऑटो रिक्षाचालकांना प्रवासी मिळत नाहीत. दोन हजारांच्या घरात ऑटो रिक्षांची संख्या असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठिण आहे.
राजेश ठाकूर
........
पेट्रोल रिक्षा- १८२०
डिझेल रिक्षा- १८०
एलपीजी रिक्षा- ००
..................
डिसेंबर
पेट्रोल-९२.७६
डिझेल-८१.८८
.....
जानेवारी
पेट्रोल-९५.०४
डिझेल-८४.४५
........
फेब्रुवारी
पेट्रोल-१००.२४
डिझेल-९०.३४