काळ्या जादूमुळे झाली संध्याची संध्याकाळ; मुलगाच ठरला काळ
By नरेश रहिले | Published: June 8, 2023 03:56 PM2023-06-08T15:56:14+5:302023-06-08T15:59:52+5:30
आईच्या चारित्र्यावरून वैतागला होता मुलगा : आईच्या अंत्यसंस्कारानंतर मुलाला खुनाच्या गुन्ह्यात अटक
गोंदिया : घरात आईचे वागणे योग्य नाही. तिच्या चारित्र्यावर मुलाला असलेला संशय आणि गुप्तधनासाठी हपापलेली संध्या काळ्याजादूसाठी कमावलेले पैसेही खर्च करीत होती. या एकंदरीत परिस्थितीमुळे वैतागलेल्या मुलानेच आईचा चाकूने गळा चिरून खून केला. ही घटना ७ जूनच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी मुलाला गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत अटक केली आहे.
गोंदिया शहराच्या चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर येथील संध्या महेंद्र कोरे (४८) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा मुलगा करण महेंद्र कोरे (२४) याला अटक केली आहे. पोलिस तपासात संशयाची सुई मृताच्या मुलावरच विसावली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असल्याची माहिती ८ जून रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांनी दिली.
मृतक संध्या कोरे ही गोंदियाच्या आमगाव रोडवरील खालसा ढाब्यावर कॅशियर म्हणून काम करीत होती. तिचा मुलगा करण महेंद्र कोरे (२४ वर्षे) हा नागपुरात एमआरशिप म्हणून कामाला होता. मात्र ६ महिन्यांपासून आई आणि मुलगा श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मृतक संध्याच्या पतीचे २० वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून ती माहेरी गोंदियात भाड्याच्या खोलीत राहात होती. तिच्या वागण्याची पद्धत घराला शोभणारी नसल्यामुळे मुलाने चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाणे, पोलीस हवालदार कवलपालसिंह भाटिया, बैस, उईके, टेंभरे, मेश्राम, प्रमोद चौहान, सतीश शेंडे, दीपक रहांगडाले, भगत, पी.सी.बिसेन, रावते, बरेवार, सोनवणे, देशमुख यांनी केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.
ती गुप्तधन शोधत होती
मृतक संध्या कोरे हिचा काळ्या जादूवर विश्वास होता. ती गुप्तधन शोधत होती. यासाठी कमावलेली रक्कम जमा झाल्यावर ती अंधश्रद्धेवर खर्च करीत होती. संध्याच्या चारित्र्यावरही करणला संशय होता. त्या चारित्र्यावरून मायलेकात वाद देखील झाला. या वादात ७ जूनच्या पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान घरात ठेवलेला धारदार चाकू उचलून आईचा गळा चिरला. रागाच्या भरात तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर वार करून तिची निर्घृण हत्या केली.
रक्तबंबाळ मृतदेह स्वयंपाक घरात अन् करण होता सोफ्यावर
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यावर संध्याचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. तर आरोपी करण हा सोफ्यावर गंभीर अवस्थेत बसलेला आढळला. त्याच्या हाताला जखम होती, असे पोलिसांनी सांगितले.
असा केला गुन्हा कबुल
मृतक संध्य हिच्या गळ्यावर, तोंडावर व शरीरावर चाकूने घाव मारले होते. संध्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी करणकडे चौकशी केली असता त्याने संध्या कोरे हिच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. त्याच्यावर प्रकाश कवडूजी पाथोडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.