अर्जुनी-मोरगाव-कोहमारा बस तत्काळ सुरू करा
By admin | Published: June 5, 2016 01:32 AM2016-06-05T01:32:48+5:302016-06-05T01:32:48+5:30
आज कानाकोपऱ्यात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. मात्र येथील अर्जुनी-मोरगाव-कोहमारा या मार्गाची बस सेवा पूर्णपणे बंद आहे.
बाराभाटी : आज कानाकोपऱ्यात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. मात्र येथील अर्जुनी-मोरगाव-कोहमारा या मार्गाची बस सेवा पूर्णपणे बंद आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची कोंडी होत असून त्यामुळे आॅटोवाल्यांची मनमर्जी वाढली आहे. तत्काळ ही बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सदर मार्गावर बस नसल्याने या मार्गावर आॅटोवाले प्रवाशांना खूपच लुटत आहेत. आपल्या मर्जीने तिकीट प्रवाशांकडून घेतात व अकरा ऐवजी १६-१७ प्रवासी कोंबून नेतात. थोड्या अंतरासाठीही वाढते दर लावले जात आहे. या मार्गावरून बस नसल्याने हा सर्व प्रकार सुरू आहे. १ जून रोजी तर अर्जुनी-नवेगावबांध या मार्गावरील आॅटो बंदच असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच फसगत झाल्याचे दिसले. अशा प्रकाराकडे कोणताच मंत्री, खासदार, आमदार व जनप्रतिनिधी ल क्ष देत नाही आहे. यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांची चांगलीच कोंडी होताना दिसते.
शालेय सत्र सुरू असताना शाळेच्या बस धावतात. पण प्रवाशांची बस मात्र कधीच दिसत नाही. मग नाईलाजास्तव आॅटोने कोंडलेला प्रवास करावा लागतो. अधीकची तिकीट सुध्दा मोजून द्यावी लागते.
अशी प्रवाशांची लुट या रस्त्यावर पाहायला मिळते. ग्रामीण भागातून सुध्दा बस सेवा सुरू आहे. पण या मार्गावर बस धावतांना कधी दिसेल असा सवाल प्रवासी करीत आहेत. करिता अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा ही बस तत्काळ सुरू करावी अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकडी, खैरी, देवलगाव, डोंगरगाव, कवठा, बोळदे, ब्राह्मणटोला, चापटी या गावातील प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)