एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 08:51 PM2018-10-20T20:51:58+5:302018-10-20T20:52:24+5:30
एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे संबंधिताच्या बँक खात्यातून पैसे काढणाºया आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे संबंधिताच्या बँक खात्यातून पैसे काढणाºया आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान पकडले.
विशेष म्हणजे, या तरूणाने तिरोडासह गोंदिया, भंडारा व तुमसर येथेही अशाच प्रकारे लोकांच्या खात्यातून पैसे काढल्याची कबूली दिली आहे. सविस्तर असे की, निलम भुपेंद्र पटले (२३,रा.चिखली) या ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान देना बँकेतील एटीएममध्ये पैसे काढत होत्या. त्यांनी तीन हजार रूपये काढले व काऊंटरवर पैसे मोजत असताना त्यांचे एटीएम कार्ड चोरून नेले होते. त्यानंतर सदर इसमाने विविध एटीएम मधून निलम पटले यांच्या खात्यातून १७ हजार रूपये काढले.
प्रकरणी तिरोडा पोलिसांनी १० आॅक्टोबर रोजी भादंवीच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाचा तपास करताना ठाणेदार संदीप कोळी व पथकाने सिसिटिव्ही फुटेजवरून आरोपीने या गुन्ह्यात वापरलेली होंडा हॉरनेट दुचाकी व आरोपीचा फोटो काढण्यात यश मिळविले.
त्यानुसार तपास करीत असताना शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान एक इसम हॉरनेट दुचाकीने भरधाव वेगात तिरोडा शहराकडे जात असताना दिसला. यावर ठाणेदार कोळी यांनी पथकासह पाठलाग करून त्याला पकडले.
इसमाने आपले नाव पवन राजेंद्र कुंडभरे (रा.मोतीनगर वॉर्ड क्रमांक १७, बालाघाट,मप्र.) सांगीतले. तसेच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली.
विशेष म्हणजे, या आरोपीने तिरोडासह गोंदिया, भंडार व तुमसर येथेही अशाप्रकारे पैसे काढल्याचा गुन्हा केला असल्याची कबूली दिली असून त्यानुसार तपास सुरू आहे.