चिचटोला येथे वन्यप्राण्यांचा हैदोस
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कारुटोला ग्रा. पं. अंतर्गत चिचटोला येथे वन्यप्राण्यांचा त्रास असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. चिचटोला व जवळच्या गावात रानडुक्कर व इतर वन्यप्राणी शेतातील पिकांची नासाडी करतात. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होते. सध्या शेतामध्ये तूर, जवस, लाखोरी, चना यासारखी पिके आहेत. मात्र, वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. काहींना लाभ मिळाला. मात्र, काही अद्यापही वंचित आहेत.
भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त
आमगाव : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्सकिट नसल्यामुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा
तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
खड्डयांमुळे अपघातांची शक्यता
सालेकसा : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्डयांमध्ये भरण घालण्यात आली असली तरी ते धोकादायकच आहेत.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी
गोंदिया : शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वेळेवर पाणीपट्टी भरूनही प्रशासनाकडून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने आजारांत वाढ झाली आहे.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत वाहतूक नियंत्रण शाखेनेही कारवाई करण्याची गरज आहे.
बँकांत दलालांकरवी होतेय फसवणूक
सडक-अर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. कामे करवून घेण्यासाठी दलालांना पैसे द्यावे लागत असल्याने नागरिक फसत आहेत.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
आमगाव : स्थानिक परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ही कुत्री एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ते जखमी करत असतात. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कचरा पेट्यांची व्यवस्था करावी
तिरोडा : येथील सहकारनगरात नगरपरिषदेच्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार मागणी करूनही व्यवस्था करण्यात आली नाही.
एसटीतील राखीव जागांचा वापर नाही
बिरसी-फाटा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र, या बसेसमधील आरक्षित जागांचा कधीच वापर होत नसल्याचे दिसून येते. एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिले असते यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार अशाप्रकारे राखीव सीट असतात; परंतु यांचा वापर होतच नाही.