लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तालुक्यातील वडेगावबंध्या, येगाव व अरुणनगर येथील आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.२४) आयोजित करण्यात आला होता. उपकेंद्राच्या इमारती नववधू सारख्या सजविण्यात आल्या. उद्घाटनाची जय्यत तयारी पण झाली मात्र ऐनवेळेवर पालकमंत्री राजकुमार बडोले येऊ शकले नसल्याने हा सोहळाच पुढे ढकलण्यात आला. यामुळे याविषयी परिसरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.जिल्हा परिषदेतर्फे वडेगावबंध्या, येगाव व अरुणनगर येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले. उपकेंद्राच्या सुसज्ज इमारती तयार झाल्या. अरुणनगर येथील इमारत तयार होऊन दोन वर्षे लोटली. उबाड लोकांनी या इमारतीची तावदाने सुद्धा फोडली होती. त्या कंत्राटदाराला बोलावून डागडूजी करण्यात आली. दोन वर्षात आरोग्य विभागाला या उपकेंद्राचे लोकार्पण करण्याची सवडच मिळाली नाही? की लोकार्पणासाठी लोकप्रतिनिधीच उपलब्ध नव्हते हा संशोधनाचा विषय आहे.या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी तसेच पाहुणे म्हणून खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे, आमदार अनिल सोले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार ना.गो.गाणार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत नमूद होती. मात्र या पत्रिकेत जिल्ह्यातील दोन आमदारांची नावे नाहीत. पालकमंत्री बडोले येणार नसल्याने हा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे कळते.आरोग्य विभागातर्फे या सोहळ्याच्या जय्यत तयारीवर खर्च करण्यात आला होता. तो वाया गेल्याच्या चर्चा जनमानसात आहेत. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलीचा विवाह सोहळा असल्याने व त्यात राजकीय मांदियाळीची उपस्थिती असल्यानेच हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचेही बोलले जात आहे. पालकमंत्री हजर नसल्याने इतर मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा का उरकण्यात आला नाही. आरोग्य विभागाला पालकमंत्र्याचेच आकर्षण का? अशाही प्रतिक्रिया परिसरात व्यक्त केल्या जात आहेत.याविषयी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयाबद्दल अनभिज्ञता दर्शविली. या आरोग्य उपकेंद्रांच्या उद्घाटनासाठी मुहूर्त केव्हा मिळणार हा प्रश्न ऐरणीवर आहे.
उपकेंद्र नववधूसारखे सजले, अन् उद्घाटन झालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:03 PM
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तालुक्यातील वडेगावबंध्या, येगाव व अरुणनगर येथील आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.२४) आयोजित करण्यात आला होता. उपकेंद्राच्या इमारती नववधू सारख्या सजविण्यात आल्या.
ठळक मुद्देआरोग्य विभागाला उद्घाटनासाठी पालकमंत्र्यांचेच आकर्षण