काळेमिरीच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:04+5:302021-08-29T04:28:04+5:30
गोंदिया : मिरे किंवा काली मिर्च उत्पादनासाठी गोंदिया जिल्ह्याचे हवामान योग्य आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रीराम ...
गोंदिया : मिरे किंवा काली मिर्च उत्पादनासाठी गोंदिया जिल्ह्याचे हवामान योग्य आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी दिली आहे. मिरी किंवा काळी मिर्चचे उत्पादन भारतात मुख्यतः केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात कोकण, आसाम व पश्चिम बंगालमध्ये घेतले जाते. काळीमिरीच्या झाडांच्या योग्य वाढीसाठी दमट व उष्ण हवामानाची गरज असते. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील बागेत डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी आंब्याच्या बागेत काळीमिरी लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.
काळीमिरीकरिता १८ ते ३८ डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापमान अधिक लागते. भरपूर पाऊस व तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात धानाचे रब्बी पीकसुद्धा घेतात. यामुळे या जिल्ह्यात दमट हवामान साधारणतः एप्रिल महिन्यापर्यंत असते. डॉ. भुस्कुटे यांची २५ वर्षे जुनी आंब्याची बाग आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार या गावात आहे. आंबा हा वृक्ष सदाहरित असून उन्हाळ्यातदेखील ही झाडे थंडावा देतात. दोन वर्षांपूर्वी डॉ. भुस्कुटे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून मिरीची कलमे आणली. आंब्याच्या झाडांच्या बुंध्यापाशी लावली. उन्हाळ्यात पाणी व्यवस्था करून या झाडांची योग्य काळजी घेतली. काळेमिऱ्याचे उत्पादन आपल्या भागात होऊ शकते का, या विचाराने प्रयोगाला सुरुवात केली. आंब्याच्या झाडाचा आधार घेत मुळाद्वारे वाढली. ती मिरे वरच्या फांद्यांपर्यंत पोहोचली. या वर्षी या मिरी लागली आहेत. दोन वर्षांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
................
कोट
आपल्या भागात ज्या शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांनी काळेमिरे लागवडीचा प्रयोग केला पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल. काळेमिऱ्याचा भाव ४०० रुपये प्रति किलो आहे. याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच परसदारात आंब्याची झाडे असल्यास घरीदेखील मिरीचा वेल लावता येईल.
डॉ. श्रीराम भुस्कुटे, माजी प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्रज्ञ