अड्याळ : मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील जनतेनी एकमत दाखविले. अड्याळ तालुका निर्मितीसाठी आज अड्याळ बंदचे आवाहन तालुका निर्मिती कृती संघर्ष समितीच्या वतीने केले होते. या आवाहनाला अड्याळवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडून शांतीमोर्चा आयोजित केला होता. यावेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर होते. मागील २५ वर्षांपासून अड्याळला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी शासन दरबारी रेटून धरण्यात येत आहे. मात्र शासनाकडून अड्याळवासीयांना केवळ आश्वासन दिली जात आहे. त्यामुळे अड्याळला तालुका घोषित करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अड्याळ हे राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. विलास श्रुंगारपवार यांच्या रुपाने राज्याला मंत्री पद मिळाले होते. राज्यमार्गावरील महत्वाचे गाव असलेले अड्याळ येथे शैक्षणिक महाविद्यालयांसह शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन व अन्य सोयी सुविधा येथे आहेत.तीन डिसेंबरला उत्तर बुनियादी शाळेत शेकडो ग्रामस्थांनी अड्याळ तालुका निर्मितीच्या मागणीला घेवून सभा घेतली. यात तालुका निर्मिती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीला गावातील सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळीनी राजकीय वैर बाजूला सारुन तालुका निर्मितीसाठी एकवटले. नवीन तालुक्याच्या निर्मितीबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये वित्त महसूल नियोजन विभागाचे आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे. परंतु जिल्ह्यातील अड्याळ तालुक्याचा अहवाल सादर होतो का, याबाबत ग्रामवासीयांना उत्सुकता लागली आहे. तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रीत आले. त्यानंतर तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष देवराव तलमले यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेकडो तरुण व नागरिकांनी गावातील मंडईपेठ, बाजारचौक, गुजरी चौक, शिवाजी चौक येथून शांती मोर्चा काढला. यानंतर हे मोर्चेकरी नायब तहसीलदार कार्यालयावर धडकले. यानंतर एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सीमा वाहने यांची भेट घेऊन मागण्याविषयी चर्चा केली.त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान मोर्चेकऱ्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक मधुकर गीते व ठाणेदार नेवारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
अड्याळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: December 12, 2015 4:23 AM