मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:34 AM2018-03-14T00:34:12+5:302018-03-14T00:34:12+5:30

मुर्री येथील जिल्हा परिषदे शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना महिनाभरापूर्वीच घडली होती.

Suspension proceedings on Headmaster | मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

Next
ठळक मुद्देजि.प.च्या सर्वसाधारण सभेत घोषणा : विद्यार्थिनीशी अश्लील चाळे प्रकरण

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : मुर्री येथील जिल्हा परिषदे शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना महिनाभरापूर्वीच घडली होती. मात्र मुख्याध्यापकाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने मुख्यध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा जि.प.अध्यक्ष व सीईओ यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण मंगळवारी (दि.१३) केली.
मुर्री येथील जिल्हा परिषद शाळेतील एका ७ वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षक लक्ष्मीचंद हरिणखेडे (५०) याने मध्यान्ह सुटीत एका खोलीत बंद करून तिच्याशी अश्लील चाळे केले. पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ (अ), (ब) सहकलम ८,१०,१२ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ह्या प्रकरणाला लोकमतने उचलून धरले होते. याचीच दखल जिल्हा परिषदेच्या मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेत जि.प.चे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी हा मुद्दा लावून धरला. माजी शिक्षण सभापती पी.जी.कटरे, माजी बांधकाम सभापती रचना गहाणे, जि.प. सदस्य किशोर तरोणे, रमेश चुऱ्हे, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर यांनी देखील परशुरामकर यांच्या मुद्याचे समर्थन केले. तब्बल एक तास या प्रकरणावर चर्चा घडवून आणली. अखेर या प्रकरणात मुख्याध्यापक आनंद पुंजे यांनी या प्रकरणाला दाबून ठेवले म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा जि.प.अध्यक्ष व मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांनी केली. सभेला जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, उपाध्यक्ष अल्ताफ हमीद अकबरअली, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, मुकाअ डॉ. राजा दयानिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व जि.प. सदस्य उपस्थित होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचेही मुद्दे समोर आले.
‘त्या’ योजनेत ७० लाखांचा घोळ
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सावित्रीबाई फुले कन्या प्रोत्साहन योजनेतर्गंत एक अथवा दोन मुलीवर प्रोत्साहन राशी म्हणून ८ हजार रुपयांचे राष्ट्रीय बचतपत्र व २ हजार रूपये रोख असे १० हजार रूपये देण्याचे शासनाचे निर्देश आहे. गोंदिया जिल्ह्यात मुलींना जन्म देणाºया हजारो कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही. हा मुद्दा प्रथम आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील जिल्हा परिषद सदस्य सुखराम फुंडे यांनी उचलून धरला होता. त्यावरही कारवाई झाली नाही. पुन्हा ४ महिन्यापूर्वी या मुद्याला उचलून धरण्यात आले. यात जि.प.चे मुख्य व वित्त लेखा अधिकारी अ.क.मडावी यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चौकशीत या योजनेत ७० लाख रुपयांचा घोळ झाल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण २०१० पासून सुरू आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.के.मेश्राम, डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. हरिश कळमकर यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा, तसेच जिल्हा परिषदेने नियुक्त केलेले कर्मचारी जे या योजनेच्या घोळात सहभागी आहेत असे लांजेवार, वित्त विभागातील हरिणखेडे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.
अश्लील चाळे करणारा शिक्षक निलंबित
जिल्हा परिषद शाळा मुर्री येथील सहाय्यक शिक्षक लक्ष्मीकांत हरिणखेडे याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा वर्तवणूक नियम १९६७ चे कलम ३ चा भंग केल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. १२ मार्च रोजी त्याला मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांनी निलंबित केले.

Web Title: Suspension proceedings on Headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.