गाफील न राहता तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणेने सज्ज राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:50+5:302021-05-08T04:30:50+5:30
गोंदिया : मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या आपत्तीशी लढा उभारताना आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे काही काळानंतर ...
गोंदिया : मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या आपत्तीशी लढा उभारताना आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे काही काळानंतर जाणवू लागले आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पर्यायाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात उपाययोजना करण्यात आल्या. मात्र ह्या उपाययोजनादेखील आगामी काळात कमी पडू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्नरत राहावे. कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचे समजून गाफील राहू नये, अशा सूचना खा. प्रफुल्ल पटेल आणि पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला केल्या आहेत.
सद्य:स्थितीत कोविड संसर्गाचा वेग कमी झाला आहे. या दिलासादायक परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे. मात्र संसर्गाचा वेग कमी झाला म्हणून यंत्रणेने गाफील राहू नये. आगामी काळात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासन कोरोना संसर्गाशी लढा देण्यासाठी आणखी मजबूत करण्याच्या अनुषंगाने कामाला लागावे. जिल्हा क्रीडा संकुल येथे १२६ बेडचे डीसीएच सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी आणखी १०० बेड वाढविण्याच्या अनुषंगाने तयारी करावी. यासंदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांत १० ते ५० बेड ऑक्सिजनयुक्त असावेत तसेच पाॅलिटेक्निक विद्यालयात बेड वाढविण्याच्या अनुषंगाने कामाला लागावे, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान २० बेड कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराकरिता सज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हा यंत्रणेला दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात ५० बेड कोविड सेंटरची अतिरिक्त व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेशी लढा उभारताना आरोग्य यंत्रणा कुठेही कमी पडू नये, या अनुषंगाने सज्ज राहण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना तसेच जि. प. मुकाअ प्रदीपकुमार डांगे यांना दिले. या विषयावर चर्चा करून शनिवारी खा. प्रफुल्ल पटेल यांचे पत्र माजी आ. राजेंद्र जैन हे जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार आहेत.