पदाधिकाऱ्याने बैठकीला हजेरी लावल्याने चर्चेला उधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:28 PM2019-06-22T21:28:41+5:302019-06-22T21:29:23+5:30
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना कामे वाटप करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला जि.प.चा एक जबाबदार पदाधिकारीच उपस्थित असल्याने मजूर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यानी आश्चर्य व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना कामे वाटप करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला जि.प.चा एक जबाबदार पदाधिकारीच उपस्थित असल्याने मजूर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यानी आश्चर्य व्यक्त केले. यामुळे कामे वाटपात राजकीय हस्तक्षेप तर करण्यात आला नाही अशी जोरदार चर्चा आहे.
गोंदिया जि.प.सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु सिंचन विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना जी कामे शासकीय नियमानुसार वाटप करावयाची असतात, त्यासाठी काम वाटप समिती तयार करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणानुसार या काम वाटप समितीचे अध्यक्षपद २००७&पर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे होते. सचिव पद हे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे आहे. परंतु २०१० मध्ये यात सरकारने बदल करीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीचे प्रमुख अध्यक्ष असतील तर सचिव पदावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सदस्यांमध्ये लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे.शासन धोरणानुसार या समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या एकाही पदाधिकाऱ्याचा कुठेही या समितीत समावेश नाही. मात्र यानंतरही जि.प.चा एक जबाबदारी या बैठकीला उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भात समितीचे सदस्य सचिव व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहू शकतात असे सांगून नवीनच जावई शोध लावला आहे. त्यामुळे या प्रकाराने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.