तालुक्यात ‘अंधेरा कायम है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:30 AM2021-07-27T04:30:24+5:302021-07-27T04:30:24+5:30
लोहारा : विजेच्या लपंडावाला घेऊन वृत्तपत्रांतून नागरिकांचा रोष बघता वीज वितरण कंपनीला थोडीफार जाग आली होती असे वाटत होते; ...
लोहारा : विजेच्या लपंडावाला घेऊन वृत्तपत्रांतून नागरिकांचा रोष बघता वीज वितरण कंपनीला थोडीफार जाग आली होती असे वाटत होते; मात्र पुन्हा वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकही त्रासले आहेत.
तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़. शेतकऱ्यांनी आपापल्या साधनांच्या आधारे धान पिकाच्या रोवणीला सुरुवात केली आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुद्दाम शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करीत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल बाकी असल्याने जोडणी कापण्यात आली आहे. काही ठिकाणी तर ट्रान्स्फाॅर्मर बंद पडले आहेत. कधी-कधी तर ट्रान्स्फाॅर्मरला दोन फेस असतात त्यातील एक फेस नाही त्यामुळे शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़. परिसरात वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होत असतो. तरीही महावितरणला जाग येत नाही. देवरी तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार बंद राहत असल्याने रोवणी कशी करणार. महावितरणच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड तर पडतोच, पण शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या निकाली काढण्या करिता वीज विभागाच्या वरिष्ठ व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे़.
---------------------------
कर्मचारी कमी पण काम जास्त
या परिसरात वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांकडे काम अधिक आणि कर्मचारी कमी अशी अवस्था आहे़. यामुळे कृषी पंपांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण होत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या शेतातील मीटरमध्ये बिघाड झाल्यास लाईनमनला फोन लावल्यास कधी या गावी, तर कधी त्या गावी असतात़. ‘लाईनमन एक अन् गाव अनेक’ अशी स्थिती आहे. त्यातच तक्रारींची संख्या वाढत आहे. यामुळे एकाही तक्रारीचे धड निराकरण होत नाही.