अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:41+5:302021-07-19T04:19:41+5:30
गोंदिया : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच दहावीचे निकाल जाहीर ...
गोंदिया : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच दहावीचे निकाल जाहीर झाले असून आता विद्यार्थी व त्यांच्या पालकांची लगबग वाढली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे अकरावीचे प्रवेशसुद्धा ऑनलाइन करण्यात यावे, अशीच विद्यार्थी आणि पालकांची इच्छा आहे. तर विद्यालयेसुद्धा ऑफलाइन प्रवेशासाठी आग्रही आहेत. इंटरनेटची समस्या तसेच अर्ज करताना येणाऱ्या त्रुटी यामुळे ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन प्रवेशच सर्वांना सोयीचे वाटते. तर शहर भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल आहे कारण बरेच विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर दुसरे अभ्यासक्रमसुद्धा करीत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यालयात नियमित गेले नाही तरी चालते, असा समज विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळेच ते ग्रामीण भागातील विद्यालयात प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.
...............
ऑफलाइन व्हावेत प्रवेश...
आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. तर सर्वच व्यवहारसुद्धा सुरळीत झाले आहेत. तर शासनाने सुद्धा ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ११ वीची प्रवेश प्रक्रियासुद्धा शासनाने ऑफलाइन करावी. ते विद्यार्थी आणि शाळांच्या दृष्टीने सुद्धी सोयीचे होईल.
- अनिल मंत्री, संस्था चालक
....................
इंटरनेटच्या समस्येमुळे आधीच ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रियासुद्धा आता शासनाने ऑफलाइनच राबवावी. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होईल. तर प्रवेश अर्जातील त्रुटी वेळीच दूर करण्यास मदत होईल.
- मुकेश अग्रवाल, संस्था चालक
......................
म्हणून घेतला गावात प्रवेश...
मागील दीड वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊनसुद्धा गावात राहावे लागले. त्यातच वर्षभराचे खोलीचे भाडेसुद्धा द्यावे लागले. तर यंदासुद्धा महाविद्यालय सुरू होणार की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे गावातीलच विद्यालयात प्रवेश घेतला.
- विलास ठाकरे, विद्यार्थी
..........
अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच विद्यालयात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीसुद्धा अभ्यासक्रम ऑनलाइन राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहरातील विद्यालयात प्रवेश घेतल्यास पुन्हा अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नीलेश वाकुडकार, विद्यार्थी.
.........
अकरावीसाठी गावातच प्रवेश का?
कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात असला तरी पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहरातील विद्यालयात प्रवेश घेतल्यास पुन्हा खोली भाड्याने घेऊन तिथे राहावे लागेल. तर पुन्हा विद्यालय बंद झाल्यास पुन्हा गावाकडे परत जावे लागेल. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण गावातच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
.............
शहरातील अकरावीचे प्रवेश देणारी विद्यालये : १०
एकूण जागा : ५६७५
गेल्या वर्षी किती अर्ज आले : ८९६७
किती जणांनी घेतला प्रवेश : ४९६७
किती जागा राहिल्या रिक्त : ७५४